नवी दिल्ली: देशभरात कोरोना व्हायरसचा प्रकोप सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत देशात लॉकडाऊन घोषित केला आहे. कोरोनाच्या या महामारीच्या काळात पंतप्रधान मोदी सतत जनतेशी संवाद साधत आहेत. आज ते पुन्हा देशवासियांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी रेडिओ कार्यक्रम 'मन की बात' च्या माध्यमातून सकाळी 11 वाजता संवाद साधतील.


पंतप्रधान मोदी या वर्षात मन की बात च्या माध्यमातून चौथ्यांदा संवाद साधत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी सूचना मागवल्या होत्या. त्यांनी 1800-11-7800 फोन नंबरवर आपला संदेश रेकॉर्ड करावा किंवा MyGov आणि NaMo अॅपवर संदेश लिहून पाठवावा, असं आवाहन केलं होतं.

भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 24942 वर गेला आहे.  5210 लोकांना डिस्चार्ज दिला आहे तर 779 लोकांचा कोरानामुळं मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांमध्ये 1490 नवीन कोरोनाबाधित सापडले आहेत. देशातील काही महत्वाच्या शहरात कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढत आहे. मुंबई, पुणे आणि दिल्लीसारख्या शहरात कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत आहे. तसेच लॉकडाऊनमुळे आर्थिक फटका मोठ्या प्रमाणात बसत आहे. त्यामुळे उद्योगांना चालना देण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा करणार आहेत.



 कालपासून दिलीय काही दुकानं उघडायला परवानगी 

देशभरात लॉकडाऊनमध्ये कालपासून मॉल्स वगळता इतर दुकानदारांना आपली दुकानं सुरु करण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठा निर्णय घेतल. मॉल्स वगळता इतर दुकानदारांना लॉकडाऊनमधून सवलत दिली असली तरी ही सवलत देताना काही अटी देखील घातल्या आहेत. मास्क बंधनकारक, 50 टक्के कर्मचारी आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे या अटींसह दुकान उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्रेसनोटनुसार, गाव पातळीवर मॉल्स व्यतिरिक्त सर्व दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिली आहे. परंतु कंटेनमेंट झोन किंवा कोरोना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेल्या ठिकाणी मात्र कोणतीही दुकानं सुरू ठेवण्याला परवानगी नसेल. तसंच शहरांमध्येही महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीतील एकेकटी दुकाने, मॉल किंवा शॉपिंग कॉम्प्लेक्सचा भाग नसलेली कोपऱ्यावरची दुकाने, रहिवासी सोसायट्यातील दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर बाजारपेठांमधील दुकानं मात्र उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही. तसंच शॉपिंग मार्केट, मार्केट कॉम्पलेक्स आणि शॉपिंग मॉल्स सुरू ठेवण्यासाठी मनाई असेल.