नवी दिल्ली :  त्याग, समर्पणाची भावना म्हणजे गौतम बुद्ध. भगवान बुध्द म्हणजे एक पवित्र विचार आहेत. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जनतेत येण्यास आवडलं असतं, पण सध्याच्या परिस्थितीमुळे ते शक्य नाही. जेव्हा निराशा पसरते, तेव्हा बुध्दांचा विचार प्रासंगिक ठरतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एका प्रार्थना सभेमध्ये सहभागी झाले. यानंतर त्यांनी देशवासियांना संबोधित केले.

भारतीय संस्कृतीनं जगाला कायम दिशा दिली आहे, असं पीएम मोदी यावेळी म्हणाले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे आभार मानले. तसेच देशवासियांना बुद्धपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

पीएम मोदी म्हणाले की, भगवान बुद्धांनी सांगितलं आहे की मानवाने कठिण परिस्थितीवर विजय मिळवण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत. थकून थांबून जाणे हा पर्याय होऊ शकत नाही. आज आपण देखील या कठिण काळातून जात आहोत. निरंतरपणे या परिस्थितीचा सामना एकजूट होऊन करत आहोत, असं मोदी म्हणाले.

भारत आज प्रत्येक भारतवासी आपला जीवन वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे, सोबतच आपल्या वैश्विक दायित्वांचं पालन सुद्धा करत आहे. आज भारत देश निस्वार्थ रुपाने, कुठल्याही भेदभावाशिवाय देशात आणि जगातल्या प्रत्येक व्यक्तिसोबत ताकतीने उभा आहे, असं मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले की, वेळकाळ बदलली, परिस्थिती बदलली, समाजातील व्यवस्था बदलल्या. मात्र भगवान बुद्ध यांचे विचार आपल्या जीवनात निरंतर प्रवाही आहेत. कारण बुद्ध हे केवळ एक नाव नाही तर एक पवित्र विचार आहेत.

आज बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने ही प्रार्थना सभा कोरोना व्हायरस बाधित आणि महामारीशी लढणाऱ्या कोरोना योद्ध्यांच्या सन्मानासाठी आयोजित केली होती. संस्कृती मंत्रालयाकडून या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. जगातील बौद्ध संघ आणि त्यांच्या प्रमुखांच्या मदतीने आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध संघाच्या सहयोगाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या प्रार्थना सभेनंतर पीएम मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. पवित्र गार्डन लुम्बिनी (नेपाळ), महाबोधी मंदिर (बोधगया, भारत), मूलगंध कुटी विहार (सारनाथ), परिनिर्वाण स्तूप (कुशीनगर) या ठिकाणांमधून प्रार्थना समारंभाचे थेट प्रक्षेपण झाले.