Customer Centric initiatives of the RBI: भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) दोन नव्या योजनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज, शुक्रवारी शुभारंभ झालाय. सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फर्सिंगच्या माध्यमातून या योजनेचा पंतप्रधान मोदी यांनी शुभारंभ केला. आरबीआय रिटेल डायरेक्ट स्कीम अर्थात आरबीआय किरकोळ गुंतवणूकदारांसाठी प्रत्यक्ष योजना आणि रिझर्व बँक- एकात्मिक लोकपाल योजना या दोन योजनांचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ झालाय. केंद्रीय अर्थ मंत्री आणि रिझर्व बँकेचे गव्हर्नर या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधन केलं. यावेळी ते म्हणाले की, ‘आज ज्या दोन योजनेचा शुभारंभ केला, त्यामुळे देशातील गुंतवणूक वाढणार आहे. तसेच या योजनांमुळे गुंतवणूकधारकांसाठी कॅपिटल मार्केटपर्यंत पोहचणं अधिक सुरक्षित आणि सोपं होणार आहे.’
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “ कोरोना महामारीच्या कठीण काळात अर्थ मंत्रालय, आरबीआय आणि अन्य आर्थिक संस्थांनी प्रशंसनीय काम केलं आहे. आतापर्यंत मध्यम वर्ग, कर्मचारी, लहान व्यापारी, वरिष्ठ नागरिक यांना सिक्योरिटीजमध्ये गुंतवणूकीसाठी बँक इन्श्युरन्स अथवा म्युचल फंडसारख्या गोष्टीचा वापर करवा लागत होता. आता या दोन योजनांमुळे सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय उपलब्ध झालाय.“
ठेवीदारांचा सिस्टमवरील विश्वास दृढ होतोय-
पंतप्रधान मोदी म्हणाले की, मागील सात वर्षांमध्ये NPAs मध्ये पारदर्शकता आल्यानं त्याची दखल घेतली जातेय. , Resolution आणि recovery वर लक्ष केंद्रीत केलं जात आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे पुनर्भांडवलीकरण करण्यात आले. वित्तीय प्रणाली आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये एकापाठोपाठ एक अनेक एक सुधारणा करण्यात आल्या. बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी, सहकारी बँकांनाही RBI च्या कक्षेत आणण्यात आले. त्यामुळे या बँकांचा कारभारही सुधारत असून लाखो ठेवीदारांचा या सिस्टमवरील विश्वासही दृढ होत आहे.
योजनेचा फायदा काय?
किरकोळ गुंतवणूकदारांना सरकारी रोखे बाजारात व्यापक प्रवेश शक्य व्हावा हा आरबीआय रिटेल डायरेक्ट योजनेचा उद्देश आहे. भारत सरकार आणि राज्य सरकारांनी जारी केलेल्या रोख्यांमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना थेट गुंतवणूक करण्याची नवी संधी या योजनेद्वारे प्राप्त होणार आहे. गुंतवणूकदार, आरबीआय समवेत सुलभपणे आणि मोफत त्यांचे सरकारी रोखे खाते ऑनलाईन उघडू शकतील. रिझर्व बँकेकडून नियमन केल्या जाणाऱ्या संस्थाविरुद्धच्या ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्याची यंत्रणा सुधारण्याचा , रिझर्व बँक – एकात्मिक लोकपाल योजनेचा उद्देश आहे. ग्राहकांना त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ‘एक राष्ट्र-एक लोकपाल’ या मध्यवर्ती संकल्पनेसह एक पोर्टल,एक ई मेल आणि एकच पत्ता यावर ही योजना आधारित आहे. ग्राहक एकाच ठिकाणी त्यांच्या तक्रारी दाखल करू शकतील, दस्तावेज सादर करू शकतील, तक्रारीची सद्यस्थिती जाणून घेऊ शकतील आणि प्रतिसादही देऊ शकतील. बहु भाषी निःशुल्क क्रमांकावर, तक्रार निवारणासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी सहाय्य आणि संबंधित माहिती दिली जाईल.