नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा आपल्या 'मन की बात' या कार्यक्रमातून डिजिटल व्यवहारांना एक जनआंदोलनाचे स्वरुप देण्यासाठी जनतेला आवाहन केलं. तसेच देशातील 15 वर्षापासून ते 70 वर्षापर्यंतच्या वयोगटातील व्यक्ती डिजिटल व्यवहारांचा वापर करत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं.


पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''डिजिटल व्यवहारांसाठी देशातील जनता पुढाकार घेत आहे. यामध्ये तरुण वर्गाचा मोठा सहभाग आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या 'डिजिधन व्यापारी योजना' आणि 'लकी ग्राहक योजना' यांना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळतोय. या योजनांमुळे डिजिटल व्यवहारांसाठी एक मोहिम सुरु झाली, अन् या अंतर्गत आजपर्यंत 10 हजार नागरिकांना बक्षिसांचं वाटप करण्यात आलं. आजपर्यंत तब्बल 150 कोटींची रक्कम वितरीत करण्यात आलं आहे.'' अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. तसेच यामध्ये 15 वर्ष वयोगटातील तरुणापासून 65 वर्ष वयोगातील ज्येष्ठ नागरिकांचा यात समावेश असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

शिवाय, या योजनेचा शेवट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी 14 एप्रिल रोजी होणार असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. तसेच डॉक्टर आंबेडकरांच्या नावाने सुरु केलेले 'भीम अॅप' 125 जणांनी आपल्या मोबाईलवर करण्याचे आवाहनही त्यांनी केलं. शिवाय डॉ. आंबेडकरांच्या जयंती दिवशी 'डिजिधन व्यापार योजना' आणि 'लकी ग्राहक योजने'ला 100 दिवस पूर्ण होत असून, या दिवशी लकी ड्रॉ काढण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

याशिवाय पंतप्रधानांनी यावेळी इस्रोच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं. ''15 फेब्रुवारी रोजी देशवासीयांसाठी ऐतिहासिक क्षण होता. या दिवशी इस्रोने आपल्या मेगा मिशनअंतर्गत एकाचवेळी अमेरिका, इस्रायल, नेदरलँड, कझाकिस्तान आदी देशांचे उपग्रह अंतराळात पाठवले. याबद्दल इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं पाहिजे.'' याशिवाय बलिस्टिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राच्या यशस्वी परिक्षणाचा उल्लेख करुन, ''या क्षेपणास्त्रांमुळे शत्रूंना आपण 100 किलोमीटरवरच रोखू शकतो. तसेच 2000 किमीवरुन येणाऱ्या क्षेपणास्त्रांना आकाशातच नष्ट करु शकतात. त्यामुळे देशाची सुरक्षा आणखीच बळकट झाली आहे,'' अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.