नवी दिल्ली : वॉशिंग मशिनमध्ये पडल्यामुळे दिल्लीत तीन वर्षांच्या जुळ्या भावांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील रोहिणी भागातल्या अवंतिका कॉम्प्लेक्समध्ये घडलेल्या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.


वॉशिंग मशिनमध्ये डोकं खाली असलेल्या अवस्थेत भावंडांचे मृतदेह आढळले आहेत. पोलिसांनी तपास सुरु केला असून प्रथमदर्शनी तरी हा अपघात असल्याचं मानलं जात आहे. पाण्यात बुडल्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितल आहे.

कसा झाला अपघात?

शनिवारी दुपारी 12 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास राखी यांनी धुण्याचे कपडे काढून ठेवले होते. टॉप लोडिंग सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशिनमध्ये अर्ध्यापर्यंत पाणी भरलं होतं. त्याचवेळी निशू आणि लक्ष ही 3 वर्षांची जुळी भावंडं बाथरुमजवळ खेळत होती.

त्यानंतर वॉशिंग पावडर आणण्यासाठी राखी जवळच्या दुकानात गेल्या. त्यावेळी त्यांचा 10 वर्षांचा आदित्य हा मोठा मुलगाही शाळेत गेला होता. घराबाहेर जाताना त्यांनी दरवाजा लॉक केला नव्हता. घरी परतण्यासाठी जास्तीत जास्त पाच ते सहा मिनिटांचा अवधी लागल्याची माहिती राखी यांनी पोलिसांना दिली.

घरात त्यांना आपली दोन्ही मुलं कुठेच न दिसल्याने त्यांनी शोधाशोध केली. शेजारच्यांकडे चौकशी केल्यानंतरही दोघांचा पत्ता लागला नाही. घाबरलेल्या राखी यांनी पती रविंद्र यांना फोन केला. दहाव्या मिनिटांला रविंद्र ऑफिसमधून तडक घरी आले. दोघांनी पुन्हा मुलांची शोधाशोध सुरु केली.

बाहेर मुलं कुठेच सापडत नसल्याने 1 वाजून 10 मिनिटांनी पती-पत्नी हवालदिल होऊन घरी परत आले. वॉशिंग मशिनजवळ जाताच त्यांना मोठा धक्का बसला. लक्ष आणि निशू ही दोन्ही मुलं डोकं खाली असलेल्या अवस्थेत मशिनमध्ये पडली होती. तात्काळ मुलांना जवळच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.