लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीत देशातील पहिल्या मल्टीमॉडेल टर्मिनलचं उद्घाटन केलं. गंगा नदीतील मालवाहतुकीमुळे नेपाळ, बांगलादेशसोबतचा जलव्यापार अधिक सुकर होणार आहे. नरेंद्र मोदींनी आपल्या लोकसभा मतदारसंघात मल्टीमॉडेल टर्मिनलचं उद्घाटन केलं. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय जहाज वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. पैसे, वेळ, इंधन, वाहतूक कोंडी यांची बचत होईल, असा विश्वास यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केला. गंगा नदीमार्गे देशांतर्गत मालवाहतूक जहाज सेवा सुरु करण्यात आली आहे. गंगा-भागीरथ-हुबळी हा सागरी मार्ग राष्ट्रीय जलमार्ग 1 म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. कोलकात्यातून आलेल्या एम. व्ही. रविंद्रनाथ टागोर या मालवाहक जहाजामधून 16 कंटेनर वाराणसीच्या खिडकिया घाटावर उतरवण्यात आले. या संपूर्ण प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च तब्बल पाच हजार 369 कोटी रुपये आहे.