PM Modi In Kedarnath: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडच्या दौऱ्यावर (PM Modi Visit Kedarnath) आहेत. पंतप्रधान मोदी यांनी केदारनाथचे दर्शन घेत रुद्राभिषेक केला. त्यानंतर त्यांनी केदारनाथमध्ये सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. केदारनाथच्या दर्शनानंतर (Kedarnath) पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी बद्रीनाथकडे प्रयाण केले आहे. 


पंतप्रधान मोदी यांचा उत्तराखंड दौरा असला तरी याचा संबंध हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीशी जोडण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी पंतप्रधान मोदी यांच्या पेहरावाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. चंबामधील वेशभूषा आणि हिमाचली टोपीच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी केदारनाथचा दौरा हा हिमाचल प्रदेशला (Himachal Pradesh) केंद्रीत ठेवून केला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 


मोदींच्या पेहरावाची चर्चा


आज केदारनाथमध्ये दाखल झालेल्या पंतप्रधान मोदींच्या पेहरावाची मोठी चर्चा सुरू झाली. पंतप्रधान मोदींनी केदारनाथसाठी हिमाचल प्रदेशमधील चंबातील महिलांनी दिलेला पेहराव परिधान केला होता. त्याशिवाय, त्यांनी हिमाचली टोपी परिधान केली होती. पंतप्रधान मोदी यांनी परिधान केलेल्या पेहरावाला 'चोल डोरा' असं म्हणतात. हा पोषाख नुकत्याच हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यादरम्यान महिलांनी पंतप्रधानांना भेट म्हणून दिला होता. 


पंतप्रधान मोदी यांनी बाबा केदारनाथची विधीवत पूजा करत रुद्राभिषेकदेखील केला. देवासमोर मोदी नतमस्तक झाले. मंदिरातून बाहेर पडताना नंदी बाबाला श्रद्धापूर्वक नमस्कार केला. 


विकासकामांचे भूमीपूजन, लोकार्पण


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केदारनाथमध्ये  भाविकांच्या सोयीसाठी सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. मंदाकिनी आस्था पथ आणि सरस्वती आस्था पथासह इतर विकासकामांची पाहणी केली. केदारनाथनंतर पंतप्रधान मोदी बद्रीनाथ येथे रवाना झाले आहेत. या ठिकाणी ते विविध विकासकामांचे भूमीपूजन आणि काही विकासकामांचे लोकार्पण करणार आहे. 


पंतप्रधान मोदी यांनी  केदारनाथ रोप-वे योजनेचे भूमीपूजन केले. हा रोप-वे 9.7 किलोमीटर लांबीचा आहे. गौरीकुंड आणि केदारनाथला हा रोप-वे जोडला जाणार आहे. त्यामुळे हे अंतर गाठण्यासाठी सहा तासांऐवजी अवघे 30 मिनिटे लागणार आहे. त्याशिवाय, हेमकुंड रोप-वे गोविंदघाट आणि हेमकुंड साहिब या दोन ठिकाणांना जोडणार आहे. हा रोप-वे 12.4 किमी लांबीचा असणार आहे. सध्या या दोन ठिकाणादरम्यानच्या प्रवासाला एक दिवसाचा कालावधी लागतो. रोप-वे नंतर हा कालावधी 45 मिनिटांवर येणार आहे. यामुळे भाविकांना मोठा फायदा होणार आहे.


केदारनाथधामचा सहाव्यांदा दौरा


पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी वर्ष 2017 मध्ये पहिल्यांदा केदारनाथचा दौरा केला. त्यानंतर या वर्षी ते दोनदा केदारनाथमध्ये होते. त्यानंतर जवळपास दरवर्षी ते केदारनाथ येथे दर्शनासाठी जातात. वर्ष 2020 मध्यो कोरोना लॉकडाउनमुळे त्यांचा दौरा स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर ते सलग दुसऱ्या वर्षी केदारनाथमध्ये दाखल झाले.