Corona XBB Subvariant : देशात दिवाळीच्या उत्साह पाहायला मिळतोय. मात्र कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे (Corona New Variant) चिंता वाढली आहे. इतकंच नाही तर शास्त्रज्ञांनी पुन्हा कोरोनाची नवीन लाट (Corona Wave) येण्याचा धोका व्यक्त केला आहे. ओमायक्रॉनचा (Omicron) नवीन XBB व्हेरियंटमुळे आरोग्य व्यवस्थेसमोर मोठं संकट निर्माण झालं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) नव्या व्हेरियंटबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेच्या (WHO) मुख्य शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या नव्या लाटेची शक्यता व्यक्त केली आहेत. कोरोनाचे नवे व्हेरियंट अतिशय संसर्गजन्य आहेत. सध्या XBB व्हेरियंटचा (XBB Sub-variant) धोका वाढताना दिसत आहे.
XBB व्हेरियंटमध्ये रोगप्रतिकारक शक्ती टाळण्याची क्षमता
जागतिक आरोग्य संघटनेनेच्या (WHO) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन (Soumya Swaminathan) यांना XBB व्हेरियंटबद्दल धोक्याचा इशारा दिला आहे. डॉ. स्वामीनाथन यांनी म्हटलं आहे की, 'ओमायक्रॉनचे 300 हून अधिक उपप्रकार (Subvariant) आहेत. सध्या XBB व्हेरियंटची चिंता आहे. XBB व्हेरियंटमध्ये (XBB Sub-variant) रोगप्रतिकारक शक्ती टाळण्याची क्षमता आहे. XBB व्हेरियंटवर अँटीबॉडीज देखील त्यावर परिणाम करत नाहीत. त्यामुळे XBB विषाणूमुळे काही देशांमध्ये कोरोनाची नवीन लाट येण्याची शक्यता आहे.'
मास्क वापरण्याचा सल्ला
कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराचा XBB व्हेरियंट अधिक संसर्गजन्य आहे. याला सामोरे जाण्यासाठी मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. आरोग्य प्रशासनाला कोरोना रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलं आहे.
देशातही नवीन व्हेरियंटचे अनेक रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. यादरम्यान अपोलो हॉस्पिटल्सचे वरिष्ठ सल्लागार डॉ. सुरंजित चॅटर्जी यांनी सांगितलं आहे की, 'सध्या सणासुदीचा काळ आहे. आपल्या अनेकांसोबत भेटीगाठी होतील. सध्या मास्क वापरणं अनिवार्य नसलं तरी आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी नागरिकांनी खुल्या आणि गर्दीचिया ठिकाणी मास्क वापरावा.'
नवीन व्हेरियंट अधिक संसर्गजन्य आणि धोकादायक
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, ओमायक्रॉनचा BA.5 व्हेरियंटही जगभरात वेगाने पसरत आहे. नव्या रुग्णांमध्ये या व्हेरियंटचे जगभरात 76.2 टक्के कोरोना रुग्ण आढळले आहेत. सध्या जगभरात कोरोना व्हेरियंटच्या तीन व्हेरियंटचा धोका पाहायला मिळत आहे. जगभरात BF.7, XBB आणि BA.5 हे नवीन व्हेरियंट वेगाने पसरत आहेत. नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनपेक्षा अधिक संसर्गजन्य आणि धोकादायक असल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.