Ghaziabad Rape Case : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) गाझियाबाद (Ghaziabad) येथे निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचं बोललं जातं होतं. पण आता गाझियाबाद सामूहिक बलात्कार प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे की, महिलेने सामूहिक बलात्कार झाल्याची खोटी तक्रार नोंदवली होती. महिलेवर बलात्कार झाला नव्हता. आरोपींना अडकवण्यासाठी या महिलेने हे सोंग रचलं होतं. पोलिसांनी याबाबत माहिती दिला आहे. पीडितेने आपल्यावर बलात्कार झाल्याचं सांगितलं होतं. मात्र मुळात त्या महिलेला आरोपींना फसवण्यासाठी प्रियकरासोबत मिळून हा बनाव रचला होता. महिलेचा आरोपींसोबत मालमत्तेप्रकरणी वाद सुरु होता, यामुळे तिने त्यांना बलात्कार प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला.


पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार यांनी गुरुवारी माहिती देत सांगितलं की, महिलेवर बलात्कार झालेला नाही. आरोपींना फसवण्यासाठी महिलेने दोघांसोबत मिळून कट रचला होता. महिलेचा आरोपीसोबत प्रॉपर्टीचा वाद सुरु होता. या वादामुळे आरोपींना फसवण्यासाठी महिलेने हा कट रचला, असं पोलिसांनी सांगितलं आहे. 


18 ऑक्टोबर रोजी पहाटे 3.30 वाजता नंदीग्राम पोलिसांना सूचना मिळाली होती की, आश्रम रोडवर एक महिला जखमी अवस्थेत सापडली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होतं महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, यावेळी महिलेने मेडिकल चाचणी करण्यास नकार दिला. यानंतर महिलेला मेरठ मेडिकल येथे पाठवण्यात आलं. तेथेही महिलेने मेडिकल चाचणीला नकार दिला. त्यानंतर महिलेला दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं. तिथे महिलेवर उपचार करण्यात आले.


पोलिसांना महिला जखमी अवस्थेत सापडली. 36 वर्षीय महिला गोणीत गुंडाळलेली आढळली होती. तिचे हात आणि पाय बांधले होते आणि तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉड घातला. यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवत तपास सुरु केला.


महिलेने केले होते 'हे' आरोप


महिलेने पोलिसांना चौकशी दरम्यान सांगितलं होतं की, पीडिता दिल्ली नंदनगर येथील रहिवासी आहे. तिच्या भावाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एक दिवस ही महिला आधी गाझियाबादमध्ये आली होती. भावाने महिलेला बस स्टँडवर सोडल्यानंतर काही जणांनी तिचं अपहरण केलं. हे आरोपी तिच्या ओळखीचे होते. त्यांनी आपल्यावर बलात्कार केला. असा आरोप महिलेनं केला होता. यावेळी आधी महिलेनं दोन आरोपी असल्याचं सांगितलं, त्यानंतर पाच आरोपी असल्याचं सांगितलं होतं. 


पोलिसांनी चार जणांना केली होती अटक


पोलिसांनी महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवून चार जणांना अटक केली होती. महिलेने पोलिसांना सांगितलं होतं की, आरोपींना अपहरण करुन दोन दिवस तिच्यावर अत्याचार केले. ज्या आरोपीविरुद्ध महिलेने एफआयआर दाखल केला आहे, त्या आरोपीसोबत महिलेचा मालमत्तेसंदर्भात आधीच वाद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


असं उघडकीस आलं प्रकरण


दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाच्या तपासादरम्यान पीडित महिलेच्या ओळखीच्या आझाद नावाच्या व्यक्तीचा मोबाईलही घटनेनंतर बंद असल्याचे आढळून आलं. त्यानंतर पोलिसांना संशय आला. तपासादरम्यान पोलीस आझादपर्यंत पोहोचले. पोलिसांनी आझादला पकडल्यानंतर आझादने कबूल केले की महिलेचा आरोपींसोबत मालमत्तेचा वाद होता आणि त्यांना फसवण्यासाठी महिलेने हा कट रचला. आरोपी तुरुंगात जावेत म्हणून महिलेने हा कट रचल्याचं आझादने सांगितलं. 


दोघांसह रचला कट


पोलिसांना तपासात आढळून आलं की, महिलेने आरोपींना फसवण्यासाठी हा बनाव रचला. या कटात तिने दोन मित्रांची मदत घेतली. महिलेने दोन दिवस अपहरण झाल्याचं सांगितलं, तेव्हा ती मित्रांसोबत होती. या घटनेत महिलेला आणण्यासाठी आणि नेण्यासाठी आझादने गौरव नावाच्या व्यक्तीच्या अल्टो कारचा वापर केला होता.