नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अकोल्यातील मोर्णा नदीच्या साफसफाईची 'मन की बात'मध्ये दखल घेतली आहे. त्याचप्रमाणे पूर्णपणे महिलांद्वारे चालवल्या जाणाऱ्या एकमेव अशा माटुंगा रेल्वे स्टेशनचंही पंतप्रधानांनी कौतुक केलं.
अकोलावासी आणि मोर्णा नदीच्या स्वच्छता कार्यात सहभाग घेतलेल्या स्वयंसेवी संस्थांचं पंतप्रधान मोदींनी कौतुक केलं आणि या उपक्रमाला शुभेच्छाही दिल्या.
अकोल्यात 13 डिसेंबरपासून स्वच्छता अभियान राबवण्यात आलं होतं. अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी या मोहिमेसाठी पुढाकार घेत जनतेला सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत तीन आठवड्यांपासून प्रत्येक शनिवारी अकोलेकर या चळवळीत श्रमदान करतात.
जिल्हाधिकाऱ्यांनी हे यश अकोलेकरांना समर्पित केलं आहे. हा सन्मान जबाबदारी वाढवणारा असल्याचं ते म्हणाले. विशेष म्हणजे 'मन की बात' कार्यक्रमात तब्बल तिसऱ्यांदा अकोल्याचा गौरव झाला.
मुंबईतील माटुंगा रेल्वे स्टेशनचाही 'मन की बात'मधून उल्लेख केला. माटुंगा हे पूर्णपणे महिलांद्वारे चालवलं जाणारं देशातील पहिलं रेल्वे स्टेशन आहे. लिम्का बुक ऑफ इंडियानेही माटुंगा स्थानकाची दखल घेतली आहे. भारतात आज महिला सर्वच क्षेत्रात पुढे जाऊन देशाचा गौरव वाढवत असल्याचं मोदी म्हणाले. त्यावेळी उदाहरण देताना त्यांनी माटुंगा स्टेशनचं नाव घेतलं.
'नारी शक्ती नेहमीच देश, समाज आणि कुटुंबाला एकतेच्या सुत्रात बांधते. देशात प्रचीन काळापासून महिलांना सन्मान दिला जातो' असं मोदी म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी प्रकाश त्रिपाठी यांचे आभार मानले.
महिला शक्तीचं उदाहरण देताना लिहिलेल्या पत्रात भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला यांचा उल्लेख केला. येत्या 1 फेब्रुवारी रोजी कल्पना चावलांचा स्मृतिदिन आहे. चावला यांनी आपल्या कार्याने अनेकांना प्रेरणा दिल्याचं पंतप्रधान म्हणाले.