झाबुआ/ मध्य प्रदेश : शाळेत दिलेला होमवर्क केला नाही म्हणून शिक्षकाने त्याच वर्गातल्या विद्यार्थ्यांनी सलग सहा दिवस 168 कानशिलात लगावण्याची विचित्र शिक्षा सुनावली. मध्य प्रदेशच्या आदिवासी बहुल झाबुआ जिल्ह्यातल्या एका सरकारी शाळात हा प्रकार आहे. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी शिक्षकाविरोधात मुख्याध्यापकांकडे तक्रार केली आहे.


झाबुआपासून 34 किलोमीटर दूर असलेल्या थांदला तालुक्यात जवाहर नवोदय निवासी शाळेत सहाव्या इयत्तेत पीडित विद्यार्थिनी शिकते. शिक्षकाने सुनावलेल्या विचित्र शिक्षेची माहिती पीडित विद्यार्थ्याचे वडील शिवप्रताप सिंह यांना तीन दिवसांनी समजली. त्यानंतर त्यांनी पत्राद्वारे या सर्व प्रकरणाची माहिती मुख्याध्यापकांना देऊन कारवाईची मागणी केली.

पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी सांगितलं की, “त्यांच्या मुलीची प्रकृती खराब असल्याने तिने 11 जानेवारी रोजी होमवर्क केला नव्हता. यामुळे विज्ञान शाखेचे शिक्षक मनोज कुमार वर्मा यांनी त्यांच्या मुलीला वर्गातील इतर 14 विद्यार्थ्यांनी 11 ते 16 जानेवारीपर्यंत रोज दोन कानशिलात लगावण्याची शिक्षा सुनावली. यामुळे विद्यार्थिनीला मानसिक धक्काच बसला. यामुळे तिच्या प्रकृतीवर वाईट परिणाम झाला.”

या घटनेमुळे मुलीला मोठा मानसिक धक्का बसला असून, आता ती शाळेत जाण्यास नकार देत असल्याचे तिच्या वडिलांनी सागंतिलं. तिच्यावर थांदलाच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी शिक्षकाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पण मुलीच्या वैद्यकीय तपासणीत कोणतीही शारिरीक इजा झाली नसल्याचे सांगत, गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत आहे

तर शाळेचे मुख्याध्यापक सागर यांनी शिक्षकाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. “जे विद्यार्थी अभ्यासात कच्चे असतात, त्यांना शिक्षक काही लहानसहान शिक्षा सुनावतात. मुलीची अभ्यासात प्रगती वाढावी यासाठी वर्मांनी ही शिक्षा सुनावली. इतर विद्यार्थ्यांनीही तिला जोराच्या कानशिलात लगावल्या नाहीत. ही एक मैत्रीपूर्ण शिक्षा होती. पण तरीही या घटनेची दखल घेऊन, यावर दोन्ही पक्षाचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल,” असं मुख्याध्यापकाने सांगितलं.

दरम्यान, या प्रकरणाची पूर्ण माहिती घेऊनच कारवाई केली जाईल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.