नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 70 वा वाढदिवस आहे. पंतप्रधान मोदी यांचा जन्म 17 सप्टेबर 1950 रोजी गुजरातच्या वडनगरमध्ये झाला होता. मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 14 सप्टेंबरपासून भाजप एक आठवड्याचं सेवा कार्य करत आहे. राष्ट्रीय स्तरापासून राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर सेवा कार्य केले जात आहे.


देशभर काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस हा राष्ट्रीय बेरोजगारी दिन म्हणून साजरा केला जात आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसाला काँग्रेसला राष्ट्रीय बेरोजगारी दिन असं नाव दिलं आहे. एनएसयूआयकडून बेरोजगारीच्या मुद्द्यावर अनेक ठिकाणी भजी विकत विरोध केला गेला.

आज सकाळपासून #राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस, #NationalUnemploymentDay असे हॅशटॅग देखील ट्विटरवर ट्रेंड केले जात आहेत.


सोलापूरमध्ये युवक काँग्रेस तर्फे उपरोधिक आंदोलन
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी युवक काँग्रेसतर्फे सोलापुरात उपरोधिक आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोदींच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. युवक काँग्रेसतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा केला गेला. यावेळी उपस्थिताना लॉलीपॉपचे वाटप करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. सोलापुरातील काँग्रेस कमिटीच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. नोटबंदी, जीएसटी, कांदा निर्यात बंदी सारखे विचित्र निर्णय घेतल्याने तुघलक अशी उपाधी दिल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली. सोलापूर रेल्वे स्थानक परिसरात भजी, पकोडे तळून आणि चहा विक्री करून निषेध नोंदवला. उच्च शिक्षित तरुणांनी यावेळी भजी तळून निषेध नोंदवला.


हे ही वाचा - खाजगी कर्ज ईएमआय कॅल्क्युलेट


पंतप्रधान मोदींच्या राजकीय प्रवासावर एक नजर...
गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान असा नरेंद्र मोदी यांचा प्रवास आहे. नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी भारताचे चौदावे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. बालपणापासूनच त्यांचा ओढा संघाकडे होता आणि गुजरातमध्ये आरएसएसचा मजबूत आधारही तेच होते. 1967 मध्ये वयाच्या 17 वर्षी ते अहमदाबादला आले आणि त्याच वर्षी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य बनले. यानंतर 1974 मध्ये ते नवनिर्माण आंदोलनात सहभागी झाले. अशाप्रकारे सक्रिय राजकारणात येण्याआधी नरेंद्र मोदी अनेक वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे प्रचारक होते.


Happy Birthday PM Modi | पंतप्रधान मोदींचा 70वा वाढदिवस, 'या' कार्यक्रमांचं आयोजन!


2001 मध्ये पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री बनले!
2001 मध्ये केशुभाई पटेल यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्याकडे गुजरातचं नेतृत्त्व सोपवण्यात आलं. डिसेंबर 2002 च्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी विजय मिळवला होता. यानंतर 2007 च्या विधानसभा निवडणुका आणि मग 2012 मध्येही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भाजपने गुजरातमध्ये निवडणुका जिंकल्या. त्यांच्याच कार्यकाळात गोध्रा जळीतकांडही घडलं होतं.


2014 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधानपदी विराजमान
तर 2014 मध्ये ते देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. एकट्या भाजपने 282 जागांवर विजय मिळवला होता. एवढंच नाही तर उमेदवार म्हणून मोदींनी वाराणसी आणि वडोदरा या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि दोन्ही मतदारसंघात त्यांचा विजय झाला. मात्र 2019 मधील लोकसभा निवडणुकीतील विजय 2014 पेक्षा फारच मोठा होता. या निवडणुकीत भाजपने तब्बल 303 जागांवर विजय मिळवला. 30 मे 2019 रोजी त्यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.