सोल : भारतीय आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासातील योगदानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (वय 68 वर्ष) यांना यंदाचा सोल पील प्राईज देण्यात येणार आहे. सोल पीस प्राईज कल्चरल फाऊंडेशनने आज (24 ऑक्टोबर) ही घोषणा केली आहे. दक्षिण कोरियातील या फाऊंडेशनने श्रीमंत आणि गरिबांमधील सामाजिक आणि आर्थिक दरी कमी करण्यासाठी 'मोदीनॉमिक्स'ची प्रशंसा केली आहे. पंतप्रधान मोदींना मानचिन्हासह दोन लाख डॉलर म्हणजेच सुमारे 1.46 कोटी रुपयांची रक्कम प्रदान केली जाणार आहे.

निवड समितीचे अध्यक्ष चो चुंग-हू म्हणाले की, 12 सदस्यीय समितीने जगभरातील 100 पेक्षा जास्त उमेदवारांमधून भारताच्या पंतप्रधानांची निवड केली. पुरस्कारांच्या दावेदारांमध्ये विद्यमान आणि माजी राष्ट्रपती, राजकीय नेते, उद्योजक, धार्मिक नेता, स्कॉलर, पत्रकार, कलाकर, अॅथलीट, आंतरराष्ट्रीय संघटना इत्यादींचा समावेश आहे. या समितीने मोदींना 'परफेक्ट कँडिडेट' असल्याचं मान्य केलं आहे. सोल पीस प्राईज मिळवणारे पंतप्रधान मोदी हे चौदावे विजेते आहेत.


समितीने पंतप्रधान मोदींच्या सरकारने भ्रष्टाचार रोखण्यासाठी तसंच नोटाबंदी यांसारख्या निर्णयाचं कौतुक केलं आहे. सक्रिय परदेशी धोरणाद्वारे प्रादेशिक आणि जागतिक शांतीसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी समितीने 'मोदी डॉक्ट्रिन' आणि 'अॅक्ट ईस्ट पॉलिसी'चंही कौतुक केलं आहे.

दक्षिण कोरियाचा हा पुरस्कार जिंकणाऱ्यांमध्ये संयुक्त राष्ट्राचे माजी सरचिटणीस कोफी अन्नान आणि बान की-मून यांचाही समावेश आहे.

या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी पंतप्रधान मोदींच्या नावाची घोषणा झाल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्वीट केलं आहे. ते म्हणाले की, "जगाने मान्य केलं आहे. जागतिक शांती, मनुष्याच्या विकासात सुधारणार आणि भारतात लोकशाही मजबूत करण्याच्या दिशेने त्यांच्या योगदानासाठी पंतप्रधानांना सोल पीस प्राईज देण्यात येणार आहे."