नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकाल आज येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कुणाची जीत अथवा हार नसेल, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. देशात शांतता, एकता आणि सद्भावाच्या महान परंपरेला कायम ठेवायचे आहे, असेही त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे.


देशाच्या न्यायपालिकेचा मान-सन्मान सर्वोच्च आहे. समाजातील सर्व पक्ष, सामाजिक-सांस्कृतिक संघटना तसेच सर्व पक्षकारांनी मागील काही दिवसांपासून सलोखा आणि सकारात्मक वातावरण निर्मितीसाठी केलेले प्रयत्न स्वागतार्ह आहेत. कोर्टाच्या निर्णयानंतर देखील आपल्याला हेच सौहार्द कायम ठेवायचे आहे.


मागील काही महिन्यांपासून अयोध्या प्रकरणी निरंतर सुनावणी होत आहे. संपूर्ण देशाचे या निकालाकडे लक्ष लागून आहे. या दरम्यान समाजातील सर्व वर्गांकडून सामाजिक शांततेसाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असेही मोदी यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील शांततेचे आवाहन केले आहे. अयोध्येचा निकाल आज येणार आहे. न्यायव्यवस्थेने न्यायोचित निर्णय देण्याची व्यवस्था केली आहे. सर्वांनी खुल्या दिलाने हा निर्णय स्वीकार करून शांतता कायम ठेवावी, असे त्यांनी म्हटले आहे.

अयोध्या निकालानंतर या गोष्टी टाळा

  • जमाव करुन थांबू नका, भाषणबाजी करु नका.

  • सोशल मीडियावर अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतर कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असे मेसेज फॉरवर्ड करु नका.

  • निकालानंतर घोषणाबाजी करुन जल्लोष करु नये, गुलाल उधळू नये, फटाके वाजवू नयेत.

  • मिरवणूक रॅली काढू नये किंवा बाईल रॅली काढू नये.

  • महाआरती किंवा समूह पठण यांचं आयोजन करु नये.

  • निकालानिमित्त पेढे, मिठाई वाटू नये. कोणतंही वाद्य वाजवू नये.

  • कोणत्याही प्रकारची जातीय दंगल होईल, असे जुने व्हिडीओ, फोटो पुन्हा सोशल मीडियावर शेअर करुन अफवा पसरवू नये.