रायपूर : दोन दिवसांपूर्वी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमादरम्यान काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. या टीकेला मोदींनी आता उत्तर दिले आहे. थरुर यांना उत्तर देताना मोदींनी काँग्रेसच्या घराणेशाहीला लक्ष्य केले. शिवाय काँग्रेसने 70 वर्षांमध्ये केलेल्या कामांचा हिशेब मागितला. छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे आयोजित एका सभेत नरेंद्र मोदी बोलत होते.


काय म्हणाले मोदी?

मोदी म्हणाले की, "मी जेव्हा पंतप्रधान झालो तेव्हा या लोकांनी (काँग्रेसने) आश्चर्य व्यक्त केले होते. एक चहावाला देशाचा पंतप्रधान कसा काय होऊ शकतो? असा प्रश्न या लोकांनी उपस्थित केला होता. आता तेच लोक असे म्हणत आहेत की, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंमुळे एक चहावाला देशाचा पंतप्रधान झाला."

काँग्रेसचे लोक माझ्याकडून साडेचार वर्षांचा हिशेब मागत आहेत परंतु त्यांच्या मागील चार पिढ्या सत्तेत होत्या. ते लोक त्यांच्या 70 वर्षांचा हिशेब कधी देणार? असा सवालही नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला आहे.


काय म्हणाले होते थरुर?

देशातल्या कोणत्याही सामान्य व्यक्तीला पंतप्रधानपदापर्यंत पोहोचणे सोपे जाईल, नेहरुंनी अशा प्रकारे देशात संस्थात्मक रचना केली की, प्रत्येकाला त्याची स्वप्न पूर्ण करणे सोपे झाले. त्यामुळेच आज एक चहावाला देशाचा पंतप्रधान झाला आहे. इथल्या लोकशाहीला पंडित नेहरुंनी आकार दिला असल्यामुळे इथली लोकशाही टिकवणे सोपे झाले आहे. अनेक देशांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तिथल्या स्वातंत्र्याचे नायक तिथले हुकूमशहा झाले. परंतु नेहरुंनी तसे केले नाही.