नवी दिल्लीः रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंकडून झालेली निराशाजनक कामगिरी पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढील 3 ऑलिम्पिक खेळांसाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना केली आहे. टास्क फोर्सकडून 2020, 2024 आणि 2028 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी खास अॅक्शन प्लॅन तयार करण्यात येणार आहे.

 

ही टास्क फोर्स भारतीय खेळाडूंना मिळणाऱ्या सुविधा, प्रशिक्षण आणि निवड प्रक्रिया कशी सुधारता येईल यावर भर देणार आहे. पुढील काही दिवसात या टास्कफोर्सची नियुक्ती करण्यात येईल. यामध्ये भारतातील तसेच परदेशी तज्ञांचा समावेश असणार आहे.

 

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला केवळ दोनच पदकांवर समाधान मानावं लागलं. बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूने भारताला रौप्य पदक मिळवून दिलं, तर कुस्तीपटू साक्षी मलिकने भारतासाठी कांस्य पदकाची कमाई केली. मात्र इतर खेळाडूंकडून निराशा झाली. भारतात खेळाडूंना पोषक वातावरण केलं जात नसल्याची अनेक स्तरांतून टिका झाली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी याचं गांभीर्य लक्षात घेत जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत.