बसमध्ये पत्नीचा मृत्यू, मृतदेहासह पतीला जंगलात उतरवलं
एबीपी माझा वेब टीम | 27 Aug 2016 02:16 AM (IST)
भोपाळ : ओदिशापाठोपाठ मध्य प्रदेशातही संवेदनशीलतेचा अंत झाल्याचं उदाहरण समोर येत आहे. बसमध्ये महिलेचा मृत्यू झाल्याने तिच्या मृतदेहासह पतीला अर्ध्या प्रवासात खाली उतरवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मध्य प्रदेशमधील घोघरा गावातील रामसिंह नावाचा इसम आपल्या पत्नीला उपचारासाठी एका खाजगी बसमधून हॉस्पिटलला घेऊन जात होता. अवघ्या पाच दिवसांपूर्वी रामसिंह यांच्या पत्नीने एका बाळाला जन्म दिला होता. मात्र प्रवासात तब्येत बिघडल्याने तिचा मृत्यू झाला. अशा कठीण प्रसंगात बसचालकानं या इसमाला मदत करण्याऐवजी त्याला अर्ध्या प्रवासातच खाली उतरवलं. रामसिंह यांना पत्नीच्या मृतदेहासह ज्या भागात खाली उतरवण्यात आलं ते जंगल होतं. त्यामुळे भर पावसात त्याला पत्नीच्या कलेवरासह जंगलात बसावं लागलं. काही तासांनंतर रस्त्यावरुन जाणारे दोन वकील रामसिंग यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी पोलिसांना 100 क्रमांकावर संपर्क साधला, मात्र पोलिसांनी फक्त चौकशी केली आणि निघून गेले. त्यानंतर वकिलांनीच खाजगी अॅम्ब्युलन्सची सोय करुन महिलेचा मृतदेह घरापर्यंत पोहचवला.