नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली. ज्या अंगणवाडी सेविकांना सध्या 3 हजार रुपये मानधन मिळतं, त्यांना आता 4 हजार 500 रुपये मिळतील. तर ज्या सेविकांचं मानधन 2250 रुपये आहे, त्यांचं 3500 रुपये होईल. अंगणवाडी सहाय्यकांना 1500 ऐवजी 2200 रुपये मिळतील, अशी घोषण पंतप्रधान मोदींनी केली.


नरेंद्र मोदी यांनी आज अंगणवाडी सेविकांशी  ‘नरेंद्र मोदी अॅप’द्वारे संवाद साधला.  यादरम्यान मोदींनी अंगणवाडीसेविकांना ही खुशखबर दिली. महत्त्वाचं म्हणजे वाढीव मानधन पुढच्या महिन्यापासूनच लागू होणार आहे. जवळपास 14 लाखांपेक्षा जास्त अंगणवाडीसेविकांना याचा लाभ होणार आहे.

इतकंच नाही तर अंगणवाडीसेविका आणि त्यांच्या सहाय्यकांना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजने अंतर्गत मोफत विमा कवचही मिळणार आहे.

मोदींनी यावेळी अंगणवाडीसेविकांचं कौतुक केलं. मोदी म्हणाले, देवाकडे हजारो हात असतात. म्हणजे देवाच्या शरिराला हात असतात असं नाही, तर त्यांच्यातर्फे काम करणारे अनेक लोक असतात. तुम्ही-अंगणवाडीसेविका माझे हात आहात.

पोषणाचा थेट संबंध स्वास्थ्याशी आहे. त्यामुळे आमच्या सरकारने झुंझुनू राष्ट्रीय पोषण मिशनची सुरुवात केली आहे. हे आमच्यासाठी मोठं मिशन आहे. त्यासाठी आशा आणि अंगणवाडीसेविकांची भूमिका महत्त्वाची आहे, असं मोदींनी नमूद केलं.