नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ६७वा वाढदिवस आहे. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे आज दिवसभर विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.


दरवेळी पंतप्रधान मोदी आपल्या वाढदिवसादिवशी आपल्या आईचा आशीर्वाद घेऊन पुढील कार्यक्रमांना सुरुवात करतात. यंदाही मोदींनी वाढदिवासनिमित्त आज त्यांच्या आईची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.

सकाळी ९ च्या सुमारास अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सरदार सरोवर नर्मदा बांध योजनेचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर मोदी गुजरातच्या वडोदरामधील दाभोई गावात लोकांना संबोधित करणार आहेत.

याशिवाय अमरेलीमधील एपीएमसी मार्केट यार्ड, डेअरी प्रकल्प आदी प्रकल्पांचं भूमिपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होईल. याशिवाय इथे आयोजित सहकार संमेलनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी संबोधित करतील. अमरेलीमध्येच कृष्णा सरोवर आणि डेअरी सायन्स कॉलेजचंही पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

मोदींच्या वाढदिवसानिमित्तानं संपूर्ण देशात भाजपतर्फे आज सेवा दिन आणि स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहेत. यावेळी देशभरात रक्तदान, मेडिकल कॅम्प घेण्यात येणार आहेत.

दरम्यान, पंतप्रधान मोदींचा गेल्या काही दिवसातील दुसरा गुजरात दौरा असून, यापूर्वी त्यांनी 14 आणि 15 सप्टेंबर रोजी जपानचे पंतप्रधान  शिंजो आबे यांच्यासोबत अहमदाबादला आले होते. यावेळी उभय नेत्यांच्या हस्ते मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं भूमिपूजन झालं.

दुसरीकडे याच वर्षीच्या शेवटी गुजरातमध्ये विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. मोदींनी पंतप्रधान पदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर गुजरातमधील ही त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक असेल. त्यामुळे गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत आगामी काळात त्यांचे गुजरातमधील दौरे वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.