नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज 30 ऑगस्ट रोजी देखील ते 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. देशभरात कोरोनाचे आकडे वाढत आहेत. आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. अनलॉक करत अनेक गोष्टींना सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आजच्या मन की बात कार्यक्रमातून नरेंद्र मोदी कोरोना अनलॉकविषयी भाष्य करतील, अशी शक्यता आहे.


गेल्या मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींनी कोरोना संकटाच्या या काळात अनेक प्रेरक गोष्टी पुढे आल्या आहेत. मात्र अजून कोरोनाचा धोका टळलेला नाही, तो आजही तेवढाच घातक जेवढा तो सुरुवातीला होता, असं मोदी यांनी म्हटलं आहे. देशातील सर्वात गरीब, शेवटच्या व्यक्तीबाबत विचार करा, असंही ते यावेळी म्हणाले होते. कारगिल युद्धाची वीस वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमिवर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, कारगिलमधील भारताचे शौर्य संपूर्ण जगाने पाहिले आहे. पाकिस्तानने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला होता. विनाकारण सर्वांशी शत्रुत्व घेणे हे दुष्टांचा स्वभाव असतो, असंही मोदी म्हणाले. कारगिलला भेट देणे हा माझ्या जीवनातील अनमोल क्षण होता, असंही त्यांनी म्हटलं होतं.


त्याआधी मन की बातमध्ये मोदी यांनी भारत संरक्षणक्षेत्रात पुढे जात आहे. भारत मैत्री करणे जाणतो आणि उत्तर देणे ही जाणतो, अशा शब्दात चीनला गर्भित इशारा दिला होता. ते म्हणाले होते की, आम्ही जे काही करतो, ती देशसेवाच असते. आपला देश सक्षम आणि स्वावलंबी बनणे हीच शहिदांना खरी श्रद्धांजली ठरेल. भारतमातेकडे डोळे वर करून पाहणाऱ्यांना उत्तर मिळाले आहे. वीरपुत्रांच्या त्यागाचा आम्हाला अभिमान आहेत. या वीरपुत्रांचे माता-पिता धन्य आहेत, असं मोदी यावेळी म्हणाले होते.


2014 पासून सतत करत आहेत मन की बात
पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात केली. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवार मन की बातद्वारे संवाद साधत असतात. आज 68 वी मन की बात आहे.