नवी दिल्ली : स्वत:ला आंबेडकरांचे भक्त म्हणवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरेगाव भीमाच्या हिंसाचारावर मौन का बाळगलं आहे? असा सवाल गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानीने केला. नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत तो बोलत होता.


प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुजरातमधील दलित नेता आणि आमदार जिग्नेश मेवाणीने स्पष्टीकरण दिलं आहे. जिग्नेश मेवाणी म्हणाला की, "मी कोरेगाव भीमाला गेलो नाही, प्रक्षोभक भाषण केलं नाही, महाराष्ट्र बंदमध्येही सहभागी झालो नाही तर माझ्यामुळे हिंसा कशी झाली हा प्रश्न मला पडला आहे."

"मी व्यवसायाने वकील आहे, त्यामुळे संविधानाचं महत्त्व माहित आहे. कायदा आणि संविधानाच्या कक्षेत राहूनच मी सगळी कामं केली आहेत," असं जिग्नेश मेवाणी म्हणाला.

पंतप्रधांनी मौन सोडावं
यावेळी जिग्नेश मेवाणीने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीवर जोरदार हल्ला केला. "दलितांना शांततेने मोर्चा काढण्याचा हक्क नाही का? पंतप्रधानांनी कोरेगाव भीमा हिंसाचारावर मौन सोडावं. देशात दलित सुरक्षित नाहीत. दलितांबाबत पंतप्रधानांची काही जबाबदारी आहे की नाही. स्वत:ला आंबेडकरांचे भक्त म्हणवणाऱ्या पंतप्रधांनी मौन सोडावं," असं जिग्नेश मेवाणी म्हणाला.

9 जानेवारीला दिल्लीत हुंकार रॅली
नवी दिल्लीत 9 जानेवारीला हुंकार रॅली काढणार असल्याची घोषणा जिग्नेश मेवाणी केली. जिग्नेश मेवाणीने सांगितलं की, "रॅली संपल्यानंतर एका हातात मनुस्मृती आणि दुसऱ्या हातात संविधान घेऊन पंतप्रधान कार्यालयात जाणार आहोत. तुम्ही काय निवडणार, भारतीय संविधान की मनुस्मृती? असा प्रश्न यावेळी मोदींना विचारणार आहे."

माझी प्रतिमा मलिन करण्याचा संघ आणि भाजपचा प्रयत्न
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या लोकांना माझी प्रतिमा मलिन करायची आहे. जाणीवपूर्वक मला टार्गेट केलं जात आहे. गुजरात निवडणुकीत भाजपचं 150 जागांचं स्वप्न भंगलं, त्यामुळे त्यांना 2019 मध्ये धोका दिसत आहे. त्यामुळेच माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा आरोप जिग्नेश मेवाणीने केला आहे.