नवी दिल्ली : नोटाबंदीवर संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तराची प्रतिक्षा अखेर संपणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या तीन दिवसांसाठी पंतप्रधान मोदी उपस्थित राहतील, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली आहे.
भाजपच्या सर्व खासदारांना शेवटच्या तीन दिवसांसाठी व्हिप जारी करण्यात आला आहे. भाजप खासदारांची संसदीय बैठक गुरुवारी सकाळी साडे 9 वाजता होईल.
याशिवाय काँग्रेसनेही दोन्ही सभागृहातील खासदारांना व्हिप जारी केला आहे. बुधवारी म्हणजे उद्या सकाळी साडे 10 वाजता काँग्रेसची बैठक होणार आहे. यामध्ये हिवाळी अधिवेशनातील शेवटच्या तीन दिवसांची रणनिती ठरवली जाईल.
हिवाळी अधिवेशन सुरु झाल्यानंतर विरोधकांनी नोटाबंदीच्या मुद्द्यावरुन सरकारला घेरलं आहे. पंतप्रधानांनी यावर उत्तर द्यावं अशी विरोधकांची मागणी आहे. मोदींच्या उपस्थितीमुळे संसदेतील कोंडी सुटण्याची शक्यता आहे.