मुंबई : गेल्या वर्षभरात मुंबईत मध्यरेल्वेवर मोठ्या प्रमाणावर अपघात झाले आहेत. तसंच या अपघातांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची संख्याही मोठी आहे. मात्र हे अपघात प्रामुख्यानं शनिवार आणि मंगळवारी झाल्याचं समोर आलं आहे. रेल्वे प्रशासनानं मुंबई हायकोर्टासमोर ही आकडेवारी उघड केली आहे.


प्रवाश्यांच्या निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होतात, असं मत न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांनी मांडलं आहे. यात स्टंटबाजी आणि निष्काळजीपणे रेल्वेट्रक ओलांडल्यानं होणाऱ्या अपघातांचं आणि मृत्यूंच प्रमाण मोठं असल्याचंही त्यानी यावेळी नोंदवलं. 30 वर्षांखालील तरुणांचं अपघातग्रस्त होण्याचं प्रमाण जवळपास 13 टक्के आहे. मुंबईत सकाळी आणि संध्याकाळी रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी असते. तसंच यावेळीच सर्वाधिक अपघात होतात असं समोर आलं आहे.

रेल्वे स्टेशनवर होणाऱ्या अपघातांमध्ये मात्र यावर्षी 8 टक्क्यांनी घट झाली आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये रेल्वेस्थानकांवर अपघातात जखमी किंवा मृत्यूमुखी पडल्याच्या 3954 घटना समोर आल्या होत्या. यावर्षी त्यामध्ये घट होऊन 3641 अपघात झाले आहेत. यातील शनिवारी 350 तर मंगळवारी 342 अपघाताची नोंद करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे रविवारी सर्वात कमी 306 अपघात नोंदवले गेले आहेत.