नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर सरकारने आता डिजिटल पेमेंट म्हणजेच कॅशलेस व्यवहारांकडे मोर्चा वळवला आहे. मात्र भारत डिजिटल होण्यासाठी किती सक्षम आहे, यावर नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हाईडर कंपनी 'अकामाई'च्या स्टेट ऑफ दी इंटरनेट - कनेक्टिव्हिटी रिपोर्टने प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.


भारतात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या 2016 च्या अखेरपर्यंत 20 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. कारण ग्रामीण भागात बहुतांश लोक सध्या फीचर फोन वापरतात. फीचर फोन वापरणाऱ्यांना इंटरनेटविना कॅशलेस व्यवहारासाठी यूएसएसडीचा मार्ग आहे. मात्र हा मार्ग अनेकांना कठिण वाटतो.

अकामाईच्या रिपोर्टनुसार भारताचा इंटरनेट स्पीडच्या बाबतीत जागतिक स्तरावर पहिल्या शंभर देशांच्या यादीतही क्रमांक लागत नाही. आशिया खंडात भारत आणि फिलीपाईन्स हे दोनच देश असे आहेत, ज्यांना इंटरनेच्या 4Mbps एवढ्या बेसिक स्पीड पर्यंतही आतापर्यंत पोहचता आलेलं नाही.

काय आहे 'अकामाई'चा अहवाल?

भारत आणि फिलीपाईन्स बेसिक इंटरनेटच्या सरासरी स्पीडच्या यादीत सर्वात खाली म्हणजे 3.5 Mbps सह 114 व्या स्थानावर आहेत. जगात सर्वाधिक सरासरी इंटरनेट स्पीड असणारा देश दक्षिण कोरिया आहे. इथे 29 Mbps एवढं सरासरी इंटरनेट स्पीड आहे.

इंटरनेट पीक स्पीडमध्ये सिंगापूरने बाजी मारली आहे. सिंगापूरमध्ये 146.9 Mbps वेगाने डाऊनलोडिंग केली जाऊ शकते. दक्षिण कोरिया पीक स्पीडच्या बाबतीत 103.6 Mbps सह चौथ्या स्थानावर आहे.

भारत इंटरनेट पीक स्पीडच्या बाबतीत 25.5 Mbps सह 104 या क्रमांकावर आहे, तर फिलीपाईन्स 29.9 या पीक इंटरनेटसह भारताच्या वर म्हणजे 88 व्या क्रमांकावर आहे. याचाच अर्थ इंटरनेट सर्फिंगसाठी सर्वाधिक अडथळा भारतामध्ये येतो.

मोबाईलवर जगात सर्वाधिक जलद इंटरनेट इंग्लंडमध्ये आहे. इथे 27 Mbps या वेगाने मोबाईलवर सर्फिंग केली जाऊ शकते, तर भारतात मोबाईल इंटरनेट स्पीडची सरासरी 3.2 Mbps एवढी आहे.

कॅशलेस होण्यासाठी इंटरनेट हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. मात्र भारत इंटरनेट मजबूत असणाऱ्या देशांच्या यादीत सर्वाधिक खालच्या स्थानावर आहे.

देशनियहाय इंटरनेट स्पीड

देश                    सरासरी इंटरनेट

1. दक्षिण कोरिया -29 Mbps

2. नॉर्वे - 21.3 Mbps

3. स्वीडन - 20.6 Mbps

4. हाँगकाँग - 19.9 Mbps

5. स्वीत्झर्लंड - 18.7 Mbps

114. भारत - 3.5 Mbps

संबंधित बातम्या :

इंटरनेटशिवाय मोबाईल बँकिंग कसं वापराल?


आधार कार्डद्वारे आर्थिक व्यवहार करण्यासाठी लवकरच मोबाईल अॅप


2000 रुपयांपर्यतच्या व्यवहारांसाठी बिनधास्त स्वाईप करा, सेवा कर नाही!


पेटीएम वॉलेट आता इंटरनेटशिवाय वापरता येणार, ऑफलाईन सेवा सुरु


बँकेतील गर्दी टाळण्यासाठी नेट बँकिंगचा वापर कसा कराल?