नवी दिल्ली : काही गोष्टी सुप्रीम कोर्टही करु शकत नाही, त्या फक्त देवाच्या हातात आहेत, असं सांगत कोर्टाने याचिकाकर्त्याला पिटाळून लावलं आहे. याचिकाकर्त्याने डासांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते.
देशातील सर्वात घातक जीव असलेल्या डासाच्या उच्चाटनासाठी सर्वोच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांवर सक्ती करावी, अशी मागणी याचिकाकर्ते धनेश लेशधन यांनी केली होती.
'आम्ही देव नाही. ज्या गोष्टी फक्त देव करु शकतो, त्या करण्यास आम्हाला सांगू नका' असं सुप्रीम कोर्टाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने सांगितलं. कुठलंच न्यायालय देशातून डासांच्या निर्मूलनासाठी असे आदेश देऊ शकतं असं वाटत नाही, असं म्हणून कोर्टाने हतबलता व्यक्त केली.
'आम्ही प्रत्येकाच्या घरात जाऊन इथे डास किंवा माशी आहे, त्याला हाकला, असं सांगू शकत नाही' असंही जस्टिस मदन लोकूर आणि जस्टिस दीपक गुप्ता म्हणाले. संबंधित याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरात डासामुळे सव्वासात लाख नागरिकांना प्राण गमवावे लागतात. शास्त्रज्ञ आणि सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ गेल्या अनेक दशकांपासून यावर उपाय शोधत आहेत.
कोर्टाच्या मध्यस्थीने या जटील प्रश्नावर तोडगा निघेल, असं लेशधन यांना वाटतं. डासांमुळे उद्भवणारे आजार रोखण्यासाठी सरकारने मार्गदर्शक तत्त्वं आखावीत, अशी मागणीही त्यांनी केली.
हे काम देवच करु शकतो, सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्याला पिटाळलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Sep 2017 12:04 PM (IST)
'आम्ही देव नाही. ज्या गोष्टी फक्त देव करु शकतो, त्या करण्यास आम्हाला सांगू नका' असं सुप्रीम कोर्टाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने सांगितलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -