नवी दिल्ली :  पंतप्रधान  मोदींनी (PM Modi)  2014 मे रोजी  म्हणून शपथ घेतली आणि सप्टेंबर 2014 ला मोदींनी पहिला अमेरिका (PM Modi US Visit) दौरा केला. त्यानंतर आजवर मोदींनी अनेकदा अमेरिका दौरा केला. या आठ वर्षाच्या काळात भारतात जरी मोदी लाट कायम राहिली तरी अमेरिकेत या काळात सत्तांतर झालं. मात्र मोदींचे अमेरिकेशी असलेले संबंध कायम चांगलेचं राहिले आणि याच संबंधाचा भारतालाही फायदा झाला. आता पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत हा दौरा ऐतिहासिक ठरणार आहे.


अमेरिकी संसदेत भाषण करण्याची  दोनवेळा संधी मिळालेले पहिले भारतीय पंतप्रधान


देशाच्या राजकीय वर्तुळात सध्या एकाच गोष्टीची चर्चा सुरु आहे.पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याची...20 ते 24 जून दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान अमेरिकी संसदेत भाषणही करणार आहेत. दोनवेळा ही संधी मिळालेले ते पहिले भारतीय पंतप्रधान असतील असं म्हणत परराष्ट्र मंत्र्यांनी या दौऱ्याचं महत्व सांगितलं आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्या निमंत्रणावरुन मोदी अमेरिका दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान 22 जूनला अमेरिकेत त्यांच्यासाठी सरकारी स्नेहभोजनही ठेवण्यात आलंय. त्याशिवाय इतर भरगच्च कार्यक्रम दौऱ्यात असणार आहे. 


मोदींचा सहावा अमेरिका दौरा


2014 नंतर मोदींचा हा सहावा अमेरिका दौरा आहे. पण या दौऱ्याचं महत्व नेहमीपेक्षा अधिक आहे. कारण यावेळी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या आमंत्रणावरुन स्टेट व्हिजीटसाठी भारतीय पंतप्रधानांना आमंत्रित करण्यात आलंय.आपल्या अत्यंत जवळच्या मित्रराष्ट्रांना, खास पाहुण्यांनाच अमेरिकेत स्टेट व्हिजिटसाठी बोलावलं जातं. त्यामुळे हा एक विशेष बहुमान मानला जातो. शिवाय अमेरिकेन संसदेला दोन वेळा संबोधित करणाऱ्या विस्टर्न चर्चिल, नेल्सन मंडेला या मोजक्या नेत्यांच्या यादीतही मोदींचा समावेश होईल. 


 मोदींच्या अमेरिका दौऱ्यातून भारताला काय मिळणार?



  •  22 जून रोजी अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी, व्हाईट हाऊसमध्ये मोदींचं स्वागत होईल

  •  अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक आणि त्याच संध्याकाळी सरकारी स्नेहभोजन

  •  23 जून रोजी पंतप्रधान मोदी हे अमेरिकेच्या संसदेला संबोधित करतील

  •  या अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान राजकीय नेत्यांशिवाय तिथल्या प्रमुख सीईओ, उद्योगपतींची, भारतीय रहिवाशांचीही भेट घेणार आहेत. 

  • संरक्षणदृष्ट्या 18 ड्रोनच्या खरेदीबाबतचा करार, सेमीकंडक्टर संबंधात मायक्रॉन टेन्कॉलॉजीसंबंधातही करार या दौऱ्यादरम्यान होणार का याची उत्सुकता आहे

  • त्यानंतर पंतप्रधान मोदी हे इजिप्तला रवाना होतील 


संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात मोदींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा


या दौऱ्याचं आणखी एक विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशीच पंतप्रधान मोदी हे अमेरिकेत असतील. पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्र संघटनेला विनंती केल्यानंतर 2015 पासून 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होतोय. त्याच संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात मोदींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होईल. 


 जागतिक राजकारणाच्या दृष्टीनं मोदींचा हा अमेरिका दौरा महत्वाचा इव्हेंट असेल दोन्ही नेत्यांची केमिस्ट्री दोन्ही नेत्यांच्या संबंधात कुठला नवा अध्याय लिहिते का हेही पाहणं महत्वाचं असेल. संरक्षणापासून ते अगदी क्लायमेट चेंजपर्यंत वेगवेगळ्या विषयांवर नेमकी काय धोरणं आकार घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.