मुंबई: अमेरिकन काँग्रेसच्या जॉईंट सेशनला (US Congress) म्हणजे तिथल्या संसदेच्या संयुक्त सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 22 जून रोजी संबोधित करणार आहेत. अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त सभेला संबोधित करणारे ते भारताचे पाचवे पंतप्रधान असतील. या आधी जवाहरलाल नेहरू (1949), राजीव गांधी (1985), पी व्ही नरसिंह राव (1994), अटल बिहारी वाजपेयी (2000) आणि डॉ. मनमोहन सिंह (2005) यांनी अमेरिकेच्या संयुक्त सभेला संबोधित केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाचवे पंतप्रधान ठरले असले तरी त्यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून आणखी एक इतिहास रचला आहे. अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त सभेला दोन वेळा संबोधित करणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत.


PM Modi State visit to the US : स्टेट व्हिजिटचा मान मिळणारे मोदी तिसरे भारतीय नेते 


तसेच नरेंद्र मोदी हे तिसरे भारतीय नेते असतील जे अमेरिकेत स्टेट व्हिजिट करतील. या आधी भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांना 1963 साली हा मान मिळाला होता. तर डॉ. मनमोहन सिंह यांना पंतप्रधान असताना म्हणजे 2009 साली हा मान मिळाला आहे. त्यांच्यानंतर आता नरेंद्र मोदी यांना हा मान मिळाला आहे. स्टेट व्हिजिटची संधी मिळणे म्हणजे अत्युच्च दर्जाची प्रतिष्ठा मिळणे असं समजलं जातं. जगभरातल्या काही मोजक्याच नेत्यांना हा मान मिळाला आहे. 


स्टेट व्हिजिट म्हणजे एखाद्या राष्ट्रप्रमुखाला मिळालेला सर्वोच्च मान समजला जातो. हा मान मिळणं म्हणजे दोन देशांमधील संबंध हे अत्यंत निकटचे असण्याचा संदेश आहे. इतर दौऱ्यापेक्षा या दौऱ्याचं महत्व अधिक असतं. त्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती आणि प्रथम महिला यांच्याकडून व्हाईट हाऊसमध्ये डिनरचं आमंत्रणही दिलं जातं.


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर असून ते 22 तारखेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बिडेन (US President Biden) यांची भेट घेणार आहेत. त्यावेळी ते अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त सभेला (US Congress) संबोधित करणार आहेत. या आधी 2016 साली नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त सभेला पहिल्यांदा संबोधित केलं होतं. आता दुसऱ्यांदा ते संबोधन करणार असून असे करणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत. 


मोदींचा सहावा अमेरिका दौरा


2014 नंतर मोदींचा हा सहावा अमेरिका दौरा आहे. पण या दौऱ्याचं महत्व नेहमीपेक्षा अधिक आहे. कारण यावेळी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या आमंत्रणावरुन स्टेट व्हिजीटसाठी भारतीय पंतप्रधानांना आमंत्रित करण्यात आलंय.आपल्या अत्यंत जवळच्या मित्रराष्ट्रांना, खास पाहुण्यांनाच अमेरिकेत स्टेट व्हिजिटसाठी बोलावलं जातं. त्यामुळे हा एक विशेष बहुमान मानला जातो. शिवाय अमेरिकेन संसदेला दोन वेळा संबोधित करणाऱ्या विस्टर्न चर्चिल, नेल्सन मंडेला या मोजक्या नेत्यांच्या यादीतही मोदींचा समावेश होईल. 


ही बातमी वाचा: