आग्रा : नोटबंदीच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पुन्हा एकदा तोफ डागली. तर नोटबंदीच्या निर्णयाचं समर्थन करणाऱ्या मध्यम वर्गीय आणि गरिबांचे मोदींनी आभार मानले.
आग्र्यात झालेल्या परिवर्तन रॅलीत मोदी बोलत होते. नोटबंदीच्या घोषणेनंतर बँकांमध्ये आतापर्यंत 5 लाख कोटी जमा झाल्याची माहिती त्यांनी दिली. बँकात रक्कम जमा झाल्यामुळे व्याजदर कमी होईल, असंही मोदींनी सांगितलं.
2022 पर्यंत ग्रामीण भागात प्रत्येकाला हक्काचं घर : मोदी
यावेळी प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचं उद्घाटन करण्यात आलं. 2022 पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला हक्काचं घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे, असं मोदींनी सांगितलं. तसेच अकराशे कोटींच्या रेल्वे योजनांचंही मोदींच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आलं.
नोटबंदीनंतर 50 दिवस त्रास होईल असं सांगितलं होतं. बँकांनी कामकाज सुरु करुन आज 10 दिवस झाले आहेत. या 10 दिवसातच 5 लाख कोटी जमा झाले आहेत. मध्यम वर्गीय आणि गरिबांनी नोटबंदीच्या निर्णयाचं स्वागत केलं. मात्र काळा पैसा बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणलेत, धनदांडग्यांच्या झोपा उडाल्या आहेत, अशा शब्दात मोदींनी टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला.