Netaji Jayanti 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्राम प्रतिमेचं अनावरण झालं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त इंडिया गेटवर होलोग्राम प्रतिमेचं अनावरण करण्यात आले आहे. याच ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ग्रेनाईटचा पुतळा बसवण्यात येणार आहे. प्रतिमेचं अनावरण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधनही केलं. यावेळी त्यांनी नेताजींच्या देशप्रेमाबद्दल वक्तव्य करताना त्यांच्या कार्याला अभिवादनही केलं. नेताजींनी स्वातंत्र्यासाठी कधीच इंग्रजांपुढे भीक मागितली नाही, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधन करताना केलं आहे.  




नेताजी नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा ग्रॅनाइटचा पुतळा तयार होत नाही तोपर्यंत इंडिया गेटवर त्यांचा होलोग्राम पुतळा बसवला जाईल. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा दिल्लीतील इंडिया गेट येथे उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याची उंची 25 फूट असेल आणि ती ग्रॅनाइट दगडापासून बनविली जाईल, अशी माहिती नवी दिल्लीतील राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाचे महासंचालक अद्वैत गडनाईक यांनी दिली. सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा पंचम जॉर्ज यांचा पुतळा होता ठिकाणी बसवण्यात येणार आहे. 1968 मध्ये जॉर्ज पंचमचा पुतळा हटवण्यात आला आहे. तेव्हापासून ही छत्री रिकामीच आहे. त्या ठिकाणी आता सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी या पायाभरणी समारंभात 2019, 2020, 2021 आणि 2022 या वर्षांसाठी सुभाष चंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कार प्रदान केले आहेत.


होलोग्राम म्हणजे काय? 
होलोग्राफिक हा डिजिटल तंत्रज्ञानाचा एक प्रकार असून हे प्रोजेक्टरसारखे काम करते. त्यात कोणत्याही गोष्टीला 3D आकार दिला जाऊ शकतो. या तंत्रज्ञानामुळे समोरची गोष्ट खरी असली, तरी ती फक्त 3G डिजिटल इमेज आहे असा भास होतो. या तंत्रज्ञानाच्या वापराने आता पर्यटक आणि दिल्लीकरांना नेताजींचा पुतळा इंडिया गेटवर बसेपर्यंत होलोग्रामद्वारे नेताजींचा पुतळा तिथे असल्याची भावना जगता येणार आहे.


नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांना श्रद्धांजली 
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सर्व देशबांधवांना पराक्रम दिनानिमित्त अनेक शुभेच्छा ! नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त माझी त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली ! मी नेताजींच्या चरणांना वंदन करतो. देशासाठी त्यांनी दिलेल्या अविस्मरणीय योगदानाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे, असे मोदी म्हणाले.