Pm Modi : भगवंत मान  (Bhagwant Mann) यांनी आज पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. भगवंत मान यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून त्यांचे अभिनंदन केले आहे. "पंजाबच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमधून भगवंत मान यांना दिले आहे. 


पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी शहीद भगत सिंग यांच्या खटकरकलान या गावी भगवंत मान यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मान यांनी यावेळी पंजाबी भाषेत शपथ घेतली.  


मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भगवंत मान यांनी हे सरकार सर्व पंजाबच्या जनतेचे असल्याचे सांगितले.  "ज्यांनी आम्हाला मतदान केले नाही त्यांचेही हे सरकार आहे. शहीद भगतसिंग यांना देश स्वतंत्र कसा होईल, याची चिंता नव्हती. परंतु, स्वातंत्र्यानंतर देश कसा असेल? याची त्यांना चिंता होती, असे भगवंत मान यांनी यावेळी म्हटले आहे. 




दरम्यान, आज शपथ घेण्यापूर्वी भगवंत मान यांनी एक ट्विट केले आहे. सूर्याची सोनेरी किरणे आज नवी पहाट घेऊन आली आहेत. शहीद भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संपूर्ण पंजाब आज खटकरकलान या गावात शपथ घेणार आहे, असे ट्वीट भगवंत मान यांनी केले आहे. 


या शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह आम आदमी पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते. 'आप'ने पंजाब विधानसभा निवडणुकीत 117 पैकी 92 जागा जिंकून आपले सरकार स्थापन केले आहे.  


महत्वाच्या बातम्या