नवी दिल्ली : कोरोना संकट काळात अनेक मजूर आपापल्या गावी परतले आहेत. गावी जाताना त्यांना अनेक समस्यांना तोंड द्याव लागलं आणि आता गावात त्यांच्यावर बेरोजगारीचं संकट उभं ठाकलं आहे. मजुरांची हीच समस्या लक्षात घेत या मजुरांसाठी केंद्र सरकार विशेष योजना सुरु करत आहे. गरीब कल्याण रोजगार असं या योजनेचं नाव आहे. येत्या 20 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेचा शुभारंभ करणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याबाबत आज माहिती दिली.


या योजनेतंर्गत देशातील विविध भागात गेलेल्या मजुरांना नव्याने रोजगार उपलब्ध करुन दिला जाणार आहे. ही योजना देशातील सहा राज्यांमध्ये सुरु केली आहे आहेत, ज्यामध्ये एकूण 116 जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, ओडिशा या राज्यातील कामगार, मजुरांना या योजनेचा फायदा होणार आहे. येत्या 20 रोजी या सर्व सहा राज्यांचे मुख्यमंत्री आणि संबंधित खात्यांचे मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.


लॉकडाऊनंतर मोठ्या संख्येने मजूर आपल्या गावी निघून गेले. सर्वाधिक मजूर कुठे परतले आहेत, याची माहिती आम्ही घेत आहोत. त्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकार विशेष योजना सुरु करत आहे, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली.


देशातील सहा राज्यांतील 116 जिल्ह्यात गरीब कल्याण रोजगार योजना राबवली जाणार आहे. 50 हजार कोटींची गुंतवणूक या योजनेत केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत कामगारांना 25 प्रकारची कामं दिली जाणार आहे. यामध्ये अंगणवाडी केंद्र, ग्रामीण रस्ते, ग्रामीण आवास, रेल्वेची कामं, सोलार पम्पसेट, फायबर ऑप्टिक केबल पसरवण्याचं काम अशा प्रकारची कामे असणार आहेत, अशी माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली. ग्रामीण भागातील विकास हा योजनेचा उद्देश आहे. यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असंही त्यांनी सांगितलं.