PM Modi To Launch PMASBY : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोमवारी सकाळी साडे दहा वाजता सिद्धार्थनगर येथे नऊ वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर, दुपारी सुमारे 1.15 वाजता, वाराणसी येथे ‘प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेचे’ उद्घाटन करणार आहेत. तसेच, वाराणसीसाठी 5200 कोटी रुपयांच्या विविध विकासप्रकल्पांचेही उद्घाटन करतील. उत्तरप्रदेशचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना (Prime Minister Atmanirbhar Swasth Bharat Yojana - PMASBY) ही देशातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करणारी सर्वात मोठी देशव्यापी योजना आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाला पूरक म्हणून ही योजना राबवली जाणार आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत, लोकांना अत्याधुनिक निदान सेवा उपलब्ध असतील. त्यासाठी देशभर प्रयोगशाळांचे जाळे निर्माण केले जाईल. सर्व जिल्ह्यांमध्ये, एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा स्थापन केल्या जातील.
पीएमएएसबीवाय योजनेचे मुख्य उद्दिष्ट, शहरी आणि ग्रामीण भागात सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात असलेल्या त्रुटी भरुन काढणे , विशेषतः नागरी आणि ग्रामीण भागातही, क्रिटीकल केअर सुविधा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सुविधा वाढवणे हे आहे. या योजनेअंतर्गत, 10 विशेष राज्यांमधील 17,788 ग्रामीण आरोग्य आणि निरामयता केंद्रात आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा वाढवल्या जातील. तसेच, देशातील सर्व राज्यांत 11,024 नवी नागरी आरोग्य आणि निरामयता केंद्रे स्थापन केली जातील. देशातल्या पांच लाख पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व जिल्ह्यात क्रिटीकल केअर म्हणजे, महत्वाच्या आजारांसाठी तसेच आकस्मिक उपचारांसाठीच्या अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होतील. त्यासाठी, काही ठिकाणी विशेष क्रिटीकल केअर रुग्णालये स्थापन केली जातील, तर इतर जिल्ह्यात, संदर्भसेवाच्या मार्फत, आरोग्य सेवा पोचवल्या जातील.
पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणारी नऊ वैद्यकीय महाविद्यालये सिद्धार्थनगर, इटाह, हरडोई, प्रतापगढ, फतेहपूर, देवरिया, गाझीपूर, मिर्झापूर आणि जौनपूर या जिल्ह्यांत आहेत. यापैकी आठ वैद्यकीय महाविद्यालयांना केंद्र पुरस्कृत ‘जिल्हा/संदर्भ रुग्णालयांशी संलग्न नव्या वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना’ या योजनेअंतर्गत मंजूरी देण्यात आली आहे तर जौनपूर इथले महाविद्यालय राज्य सरकारने विकसित केले आहे.