नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर ज्या व्यक्तीचा सर्वाधिक प्रभाव राहिलेला आहे, ज्यांचा उल्लेख खुद्द मोदींनीच अनेकदा पितृतुल्य असा केलेला आहे त्या लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त  राजधानी दिल्लीत कार्यक्रम होणार आहे.


लक्ष्मणराव इनामदार उर्फ वकीलसाहेब हे मूळचे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातल्या खटावमधले. पण गुजरातमध्ये संघप्रचारक म्हणून 1943 सालापासून ते  काम करत होते. 1960 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी त्यांच्या बालपणात होते, त्याचवेळी ते इनामदारांच्या व्यक्तिमत्वानं प्रभावित झालेले. वडनगरमध्ये शुद्ध गुजरातीमध्ये भाषण देताना मोदींनी त्यांना पहिल्यांदा पाहिलेलं. त्यानंतर त्यांच्या सेवावृत्तीनं ते भारावून गेले. गुजरातमध्ये राहून नव्या युवकांना संघाशी जोडण्यात लक्ष्मणराव काम करत होते.

आपल्या जडणघडणीत लक्ष्मणरावांचा फार मोठा वाटा असल्याचं मोदी सांगतात. राजधानी दिल्लीतल्या विज्ञानभवनात होणाऱ्या कार्यक्रमात मोदी लक्ष्मणरावांच्या आणखी काय आठवणी सांगणार याची उत्सुकता आहे.

लक्ष्मणराव इनामदार यांचं सहकार भारती या सहकारी चळवळीशी निगडीत संस्थेच्या स्थापनेतही मोठं योगदान आहे. सहकार चळवळीतल्या विविध घटकांचा आपापसांत सुसंवाद निर्माण होऊन, त्यांना एक समान व्यासपीठ मिळावं, त्याचा अधिकाधिक प्रसार व्हावा यासाठी ही संस्था निर्माण झालेली होती. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन अनेक दिग्गज नेत्यांनी या संस्थेत योगदान दिलेलं आहे.

इनामदार हे मूळ मराठी असले तरी गुजरातमध्ये संघासाठी तब्बल 30 ते 35 वर्षे त्यांनी काम केलं. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी ते गुजरातमधल्या नवसारीमध्ये कामासाठी दाखल झाले होते. संघ प्रचारक म्हणून मोदींशी आजवर अनेकांचा संपर्क आला असला तरी त्यांच्या आयुष्यात सर्वाधिक प्रभाव याच मराठी व्यक्तीचा आहे. त्यामुळेच 2014 नंतर ज्या दोन व्यक्तींचं नाव मोदी सातत्यानं घेतात, त्यात दीनदयाल उपाध्याय यांच्याशिवाय लक्ष्मणराव इनामदार यांचंही नाव आहे.