गोव्यातील सर्व नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. साळावली, अंजुणे, आमठाणे व पंचवाडी ही धरणे फुल्ल झाली आहेत. त्यामुळे धरणाचे दरवाजे खोलण्यात आले असून राज्य सरकारने जनतेला पूरसदृष्य परिस्थितीबद्दल धोक्याचा इशारा दिला आहे.
परतीच्या पावसाने राज्यात सर्वत्र थैमान घातलेले आहे. सोमवारी रात्री उशिरा सुरु झालेला पाऊस बुधवारी दुपारपर्यंत सर्वत्र चालू होता. पेडण्यात सर्वाधिक 11 से. मी. पावसाची नोंद झाली आहे. परतीच्या जोरदार पावसामुळे गेल्यावर्षीची सरसरी भरून काढण्यासाठी आता फक्त 15 इंच पावसाची गरज आहे.
वाळपईत पावसाने 132 इंच पूर्ण केले आहे. साखळीत पावसाने शतक गाठले. पेडणे, म्हापसा दोन्ही ठिकाणी आज पाऊस शतक ओलांडण्याची शक्यता आहे.
पावसाने यावर्षीच्या सरासरी गाठण्याच्या उद्दिष्टापर्यंत मजल मारली असून पुढील दोन दिवसात राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पणजी वेधशाळेने व्यक्त केली आहे. सध्याच्या मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे भातशेती धोक्यात आलेली आहे.
राज्यातील जोरदार पडणाऱ्या पावसामुळे सर्व धरणे पाण्याने पूर्णत: भरली असून अणजुणे धरणाचे चारही दरवाजे खोलण्यात आले आहेत. यामुळे साखळीत वाळवंटी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे. पावसाचा जोर वाढला तर पुराची शक्यता असल्याने राज्य सरकारने जनतेला सावधानतेचा इशारा दिलेला आहे.
वादळी वारे आणि जोरदार पाऊस यामुळे समुद्र खवळलेला असून पर्यटकांनी समुद्रात पोहण्यासाठी पुढील 4 दिवस उतरु नये असे आवाहन किनाऱ्यावरील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नमलेल्या दृष्टि या संस्थेतर्फे करण्यात आले आहे.पर्यटक पावसाचा आनंद लूटत किनाऱ्यांपर्यंत येत असले तरी हवामान लवकर सुधरो आणि समुद्र स्नान करण्यास मिळो अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.