नवी दिल्ली : जूनमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्या माजी केंद्रीय मंत्री भरत सिंह सोळंकी यांना तब्बस 101 दिवसांनंतर गुरुवारी रुग्णालयातून सोडण्यात आले. कॉंग्रेस नेते सोळंकी ( 66) यांनी डिस्चार्जनंतर पत्रकारांशी बोलताना खासगी रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी चांगले उपचार देऊन त्यांचे प्राण वाचवल्याबद्दल त्यांचे आभार मानले.


पंतप्रधान मोदी यांनी फोन करून सोळंकी यांच्या तब्येतीची विचारपूस देखील केली आहे. त्यानंतर त्यांनी ट्वीट केले आणि म्हणाले, "भरत सोळंकी यांना फोन करुन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. कोरोना विरुद्धच्या 100 दिवसांच्या लढाईदरम्यान त्याने उल्लेखनीय धैर्य दाखवले आहे. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो".





गुजरातमधील आनंद जिल्ह्यातील बोरसाड येथे राहणाऱ्या सोळंकी यांना 22 जूनला वडोदरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्येत बिघडल्यानंतर त्यांना 30 जून रोजी अहमदाबादच्या सीआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोळंकी म्हणाले की, "मला विश्वास होता की, मला काहीही घडणार नाही आणि मी सावधगिरी न बाळगता लोकांना भेटत राहिलो. मी आवाहन करतो की, कोरोनाला गांभीर्याने घ्या, सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क घाला. हॉस्पिटलमध्ये भरती होण्यापेक्षा मास्क घालणे कधीही उत्तम आहे."