AAP-Congress On PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतील भाषणादरम्यान मजूरावरुन महाराष्ट्र काँग्रेस आणि आप पक्षावर टीकास्त्र सोडलं होतं. त्यानंतर काँग्रेस नेते आणि आपकडून मोदींना प्रत्युत्तर देण्यात आले. मोदी खोटं बोलत असल्याचा आरोपही केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदींचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलत आहेत, अशी पोस्ट केली आहे. दुसरीकडे काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनीही मोदींवर निशाणा साधला. लॉकडाउनमध्ये मजुरांचे हाल झाल्यामुळे मोदींनी माफी मागायला हवी. पण मोदींनी माफी तर मागितली नाहीच, पण मदत करणाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केजरीवाल सरकारवर टीका करताना म्हटले की, कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये दिल्लीमध्ये असं सरकार होते, जे झोपडीत राहणाऱ्यांना घरी जा, संकट वाढत आहे, असे सांगत होते. तसेच दिल्लीमधून जाण्यासाठी त्या सरकारने बसची व्यवस्थाही केली होती, पण त्यांना अर्ध्यावरच सोडलं होतं. त्यामुळेच उत्तरप्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला. त्याआधी या राज्यात कोरोनाचा वेग कमी होता, असा टोला मोदी यांनी केजरीवाल यांना लगावला होता. मोदींच्या या टीकेला उत्तर देताना केजरीवाल यांनी मोदींच्या भाषणाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यासोबत ते म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलत आहेत. कोरोना काळात ज्या लोकांना त्रास सहन करावा लागला, अनेकांचा मृत्यू झाला. या लोकांमध्ये संवेदना व्यक्त करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकारण करत आहेत. पंतप्रधानांना हे शोभा देत नाही.’ 






पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असाच आरोप महाराष्ट्र काँग्रेसवरीही केला होता. काँग्रेसमुळेच देशात कोरोना पसरला. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकांना त्यावेळी काँग्रेसने मुंबई सोडण्यासाठी प्रोत्साहित केलं होतं. अनेकांना मोफत तिकिटेही दिली, असा आरोप मोदी यांनी केला होता. मोदींच्या या आरोपाला काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदींच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत टीका केली. त्या म्हणाल्या की, ‘कोरोना काळात ज्यांना घरी जाण्यासाठी कोणतेही साधन नव्हते, पायी जात होते, त्यांच्याकडे खाण्यासाठी काहीही नव्हते, अशा लोकांना मदत करु नये असे मोदींना म्हणायचे आहे का? तसेच मोदींनी त्यावेळी झालेल्या मोदींच्या प्रचारसभा, रॅलीमध्ये गर्दी होती, त्यामधून कोरोना पसरला नाही का? ‘
 
मोदींच्या वक्तव्याला उत्तर देताना सचिन सावंत म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसने लॉकडाऊन मध्ये गरिब मजूरांना तिकीट काढून ट्रेनमध्ये बसवले आणि घरी पाठवल्याने कोरोनाचा प्रसार केला असा आरोप हा मोदी सरकारच्या असंवेदनशीलता, निलाजरेपणा आणि हृदयशून्यतेचे उदाहरण आहे. मोदी सरकारच्या या निगरगट्ट पणाचा जाहीर निषेध! मोदी सरकारने कोट्यवधी कामगारांना वाऱ्यावर सोडले म्हणून काँग्रेसने गरीब कामगारांच्या तिकिटांसाठी पैसे दिले. असहाय्यांना मदत करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. ही शिवरायांची शिकवण आहे. कोरोना पसरवला असे म्हणून भाजपाने महाराष्ट्राचा अपमान केला आहे. ट्रंपला नमस्ते करताना किंवा एमपीतील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी लॉकडाऊन केला नाही तेव्हा कोरोना पसरला नाही. ट्रेनही काँग्रेसने चालवली कारण पियुष गोयल थाळ्या वाजवत होते. गुजरातमधून गेलेले मजूर कोरोना पसरवत नव्हते. फक्त महाराष्ट्रातील मजूरांनी कोरोना पसरवला.