नवी दिल्ली: राष्ट्रपतींच्या अभिभाषणासंबंधी धन्यवाद प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली आहे. देशातील महागाई ही सरकारच्या हाताबाहेर आहे, जगभरातल्या घडामोडींचा भारतातील महागाईवर परिणाम होत असल्याचं सांगत नेहरुंनी त्या वेळी महागाईची जबाबदारी झटकली होती. पण कोरोना काळातही महागाईचा दर 5.2 टक्क्क्यांपर्यंत ठेऊन आमच्या सरकारने ती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं नरेंद्र मोदींनी संसदेत सांगितलं. 


नेहरुंनी महागाईची जबाबदारी झटकली होती...
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "ज्या काळात जागतिकीकरण नव्हतं, जागतिक गोष्टी एकमेकांशी जोडल्या गेल्या नव्हत्या त्या काळात नेहरु म्हणाले होते की, कोरियातील लढाईचा परिणाम हा आपल्या देशातील महागाईवर होतोय. कोरियातील युद्धामुळे आपल्या देशातील वस्तुंच्या किंमती वाढतात आणि त्या आपल्या नियंत्रणाच्या बाहेर जातात. देशाचे पहिले पंतप्रधान नेहरुंनी देशातील महागाईची जबाबदारी झटकली होती."


पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, "जर अमेरिकेमध्ये काही झालं तर त्याचा परिणामही आपल्या देशाच्या महागाईवर होतोय. पण आमच्या सरकारने कोरोना काळातही महागाईचा दर हा 5.2 टक्क्यांवर नियंत्रित ठेवलं. कॉंग्रेसच्या काळात जर कोरोनाची परिस्थिती असती तर त्यांनी महागाईची जबाबदारी ही कोरोनावर ढकलली असती आणि आपले हात झटकले असते."


 






पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या आधीही अनेक वेळा जवाहरलाल नेहरु यांच्यावर टीका केली आहे. आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर बोलताना त्यांनी पुन्हा एकदा नेहरु आणि काँग्रेसवर टीका केल्याचं दिसून आलं.


संबंधित बातम्या: