PM Modi Independence Day speech: भारताने आज एक मोठं स्वप्न पाहिलं आहे. देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील तेव्हा 2047 साली आपण विकसित भारताचे ध्येय पूर्ण करुन राहू. 140 कोटी जनतेच्या पुरुषार्थाने आपल्या हे ध्येय साध्य करायचे आहे, असा निर्धार पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी व्यक्त केला. ते शनिवारी भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence Day) दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन (Red Fort) बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या भविष्यातील वाटचालीबाबत भाष्य केले. 140 कोटींची लोकसंख्या असलेला देश विकसित होण्याचा संकल्प करतो तेव्हा तेव्हा जगात हे त्या देशाच्या साहसाचे प्रतिक ठरते. जगाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. हे मी असंच बोलत नाही. गेल्या 12 वर्षात देशातील कोट्यवधी नागरिकांनी गरीब-श्रीमंत, शहरी असो ग्रामीण असो, प्रत्येकाने गेल्या 12 वर्षात समर्पणाच्या भावनेने देशाला उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मी त्यांच्या या प्रयत्नांचा सन्मान करतो. त्यामुळेच गेल्या 12 वर्षात 25 कोटी दारिद्र्याच्या खाईतून वर निघाले आहेत. आपण कधीकाळी कमकुवत अर्थव्यवस्था होता. पण आज भारताचा समावेश जगातील पहिल्या पाच प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये होतो, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.

Continues below advertisement

पंतप्रधान मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरुन स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रथेप्रमाणे देशवासियांना उद्देशून भाषण केले. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. आज भारताला स्वातंत्र्य मिळून 79 वर्ष पूर्ण झाली असून देश स्वातंत्र्याच्या 80 व्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाल किल्ल्यावरून सलग तेराव्यांदा देशातील जनतेला संबोधित करत आहेत. तसेच स्वातंत्र्यदिन सोहळ्यात पहिल्यांदाच गायलं जाणारं वंदे मातरम् हे गीत या सोहळ्याचं खास आकर्षण ठरले.

आपण आज 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. आज प्रत्येकाच्या हृदयात वंदे मातरमचा नारा गुंजत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लाल किल्ल्यावर यंदा पहिल्यांदाच वंदे मातरमचे स्वर गुंजत आहेत.  तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्यादिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या पुण्यात्मांचे आज देश स्मरण करत आहे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन खर्ची घातले. स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारांना मी श्रद्दापूर्वक नमन करतो, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.

Continues below advertisement

गेल्या काही दिवसांत देशाच्या काही भागांत पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या. संपूर्ण देश येथील पिडीतांच्या सोबत आहे. कोणतेही राष्ट्र जेव्हा महान होते, सिद्धी प्राप्त करते कधी तर आपली स्वप्न, संकल्प आणि सामर्थ्याच्या जोरावर पुढे जातो तेव्हा. आता लहान स्वप्न बघून चालणार नाही, आता आपल्याला मोठी स्वप्नं बघावी लागतील. कारण मोठी स्वप्नं आपल्या विचारांचे क्षितिज रुंदावत असतात. आपले संकल्प दृढ असले पाहिजेत. जेव्हा संकल्प दृढ असतो तेव्हा अडचणींमधून मार्ग काढण्याचा मार्ग आपोआप सापडतो. त्यामुळे आपले संकल्पही उंच असले पाहिजेत. संकल्प आणि स्वप्नं मोठी असता तेव्हा सामर्थ्यांची उंची वाढते, प्रयत्नांची उंची वाढते. तेव्हाच आपण स्वप्नांना साकार करु शकतो, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.

भारत स्वतंत्र झाला पण देशाच्या विकासाने हवी तशी गती पकडली नाही. होतंय, चालतंय, होईल, बघून घेऊ यामध्येच आपण अडकून पडलो. 2014 येईपर्यंत भारताची अर्थव्यवस्था फ्रेजाईल 5 मध्ये गणली जात होती. पण गेल्या 12 वर्षांमध्ये देश वेगाने विकास करत आहे. गेल्या 12 वर्षात संरक्षण क्षेत्रात उत्पादन चारपटीने वाढले, खादी-ग्रामोद्योग उत्पादन पाच पटीने वाढले, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे उत्पादन सात टक्क्यांनी वाढले, आधुनिक रेल्वे कोचनिर्मिती 21 टक्के वाढले, मोबाईल फोन उत्पादन 33 टक्के वाढले, डिजिटल आणि इनोव्हेशन क्षेत्रातही भारताने ठसा उमटवला. इंटरनेट ग्राहकांची संख्या 4 पटीने वाढली, पेटंट मिळवण्याची संख्या चार पटीने वाढली, डिजिटल व्यवहार 100 टक्के वाढल्याचे पंतप्रधान मोदी यांनी निदर्शनास आणून दिले.

PM Modi Speech: स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतक्या वेगाने विकासकामे झाली: मोदी

सामान्य माणसांच्या सुविधांसाठी आम्ही तितक्याच गंभीरतने काम केले. दरवर्षी 15 पट वेगाने नळ जोडण्या दिल्या, प्रत्येक वर्षी सहापट वेगाने गॅस कनेक्शन दिले, चार पट वेगाने गरिबांसाठी शौचालय बांधले, दरवर्षी तीन पट वेगाने गरिबांना घर दिले. तसेच आम्ही प्रशासनात बदल केले. हजारो मंजुऱ्या संपवल्या, शेकडो जुने कायदे रद्द केले. जुन्या कायद्यांनी 21 व्या शतकात कारभार चालू शकत नाही. आधुनिक पायाभूत सुविधांसाठी मेट्रो ट्रेन सुरु केली, सार्वजनिक वाहतूक सक्षम केली. आम्ही ज्या स्केलवर आणि वेगाने काम केले, हा विस्तार आणि उपलब्धी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा एका दशकात साध्य केल्या. हा वेग पाहता 2047 मध्ये विकसित भारताचा संकल्प अपूर्ण राहणार नाही. या सगळ्या गोष्टी याच्या साक्षीदार आहेत. मात्र, त्यासाठी आत्मविश्वास, आत्मगौरवाची गरज असते, त्यासोबत आत्मनिर्भर भारताची गरज आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले.

गेल्या काही वर्षात आमचा हा प्रयत्न राहिला आहे की, भारताने आता दुसऱ्या देशांवर अवलंबून न राहता आत्मनिर्भर झाले पाहिजे. जगातील अन्य देशांमध्ये बऱ्याच गोष्टी मिळतात, स्वस्त मिळतात, लवकर मिळतात. पण याने आपले सामर्थ्य वाढणार नाही, आपली कसोटी लागत नाही. त्यामुळे आपल्यालाही आपल्या क्षमता वाढवायच्या आहेत. आपल्या हिताची सुरक्षा स्वत:लाच करायची आहे. त्यासाठी आत्मनिर्भर भारताचा संकल्प महत्वाचा असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.