मुंबई: झारखंडमध्ये ईडीने विविध ठिकाणी छापेमारी करत मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली आहे. झारखंडचे ग्रामविकासमंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सहाय्यक संजीव लाल यांच्या नोकराच्या घरातून  रोकड जप्त केल्याची माहिती ईडीने दिली आहे. ईडीच्या या कारवाईवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेससह इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली आहे. ईडीच्या कारवाईत जप्त केलेली रक्कम मोजताना पैसे मोजणारं यंत्रही बंद पडलं होतं असा टोला मोदींनी लगावला. तर ज्यांच्याकडे नोटांचा डोंगर सापडतो ते काँग्रेसच्या जवळचे का असतात? असा सवाल पंतप्रधान मोदींनी केला. ज्यांच्याकडून पैसे लुटले त्यांना ते परत करण्यासाठी आपण कायदेशीर सल्ला घेत असल्याचंदेखील मोदींनी म्हटलंय.


ओडिशातील नबरंगपूर येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील ईडीच्या छाप्याचा उल्लेख केला. काँग्रेससोबतच इंडिया आघाडीवरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. 


झारखंडमध्ये नोटांचा डोंगर 


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'मी गरीब आईचा मुलगा आहे आणि मला गरिबांचे दुःख समजते. मी एक रुपया पाठवीन आणि कोणाला एक पैसाही खायला देणार नाही. जो खाईल तो तुरुंगात जाईल आणि तो तुरुंगातील भाकरी मोडेल. आता तुम्ही घरी जाऊन टीव्ही बघा, तुम्हाला झारखंडमध्ये सापडलेले नोटांचा डोंगर दिसेल. नरेंद्र मोदी हा लोकांच्या चोरीचा माल पकडत आहेत. जर मी त्यांची चोरी आणि लूट थांबवली तर मला शिव्या देणार की नाही? पण त्यांच्या शिव्या खाऊनही मी तुमचा हक्काचा पैसा वाचवावा की नाही?'


गरिबांच्या पैशाची लूट थांबली पाहिजे


पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, गरिबांच्या पैशांची लूट थांबावी म्हणूनच मोदींनी जनधन खाती, आधार आणि मोबाईल अशी त्रिसूत्री निर्माण केली. आता घरबांधणीचे पैसे थेट तुमच्या खात्यात जातात. गॅसचे पैसे थेट तुमच्या खात्यात जातात, मनरेगाचे पैसे थेट तुमच्या खात्यात आहेत, किसान सन्मान निधीचे पैसे थेट तुमच्या खात्यात आहेत. म्हणजे प्रत्येकाला थेट फायदा, कोणताही भेदभाव नाही आणि ही मोदीची गॅरंटी आहे.


ईडीने झारखंडच्या मंत्र्याच्या ओएसडीच्या घरगड्याच्या घरावर छापेमारी केल्यानंतर हे घबाड हाती लागलं आहे.  नोटांची बंडलं झारखंडमधल्या जहांगीर आलमच्या घरात मिळाली. हा जहांगीर आलम संजीव लाल यांचा घरगडी आहे. हा संजीव लाल झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचा ओएसडी म्हणजे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी आहे.


ही बातमी वाचा: