नवी दिल्ली : मानवी हक्क (Human Rights)या गोष्टीकडे केवळ राजकीय फायदा म्हणून पाहिलं जातंय. त्यामुळे मानवी हक्कांचं तसेच देशाच्या लोकशाहीचं मोठं नुकसान होत आहे. मानवी हक्कांच्या नावाखाली देशाच्या प्रतिमेला मलिन करण्याचं काम काही लोकांकडून सुरु असल्याची चिंता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. अशा गोष्टी वेळीच ओळखून त्याबद्दल आपण सावध राहिलं पाहिजे असंही मोदी म्हणाले. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या 28 व्या स्थापना दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "मानवी हक्कांचा विषय येतो त्यावेळी काही लोक ठरावीक घटनांवर, ठरावीक घटकांच्या हक्कांच्या उल्लंघनावर मोठी चर्चा करतात. पण त्याच पद्धतीच्या घटना इतर ठिकाणी होतात, त्यावर हे लोक गप्प राहणं पसंत करतात. त्यामुळे ठराविक घटनांवर आवाज उठवून देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, "काही लोकांकडून मानवी हक्कांच्या घटनांकडे राजकीय फायद्याच्या दृष्टीकोनातून पाहिलं जातंय आणि त्याचा वापर राजकारणासाठी केला जातोय. त्यामुळे मानवी हक्कांचं नुकसान होतयंच पण त्या सोबत देशातील लोकशाहीचं मोठं नुकसान होतं. या लोकांच्या वृत्तीमुळे मानवी हक्कांच्या संकल्पनेचंही नुकसान होतंय."
आपल्या देशामध्ये मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी शतकांहून मोठा स्वातंत्र्यलढा लढल्याचं पंतप्रधानांनी आपल्या भाषणामध्ये अधोरेखित केलं.
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचा 28 वा स्थापना दिवस
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचा आज 28 वा स्थापना दिवस आहे. या आयोगाची स्थापना 12 ऑक्टोबर 1993 रोजी करण्यात आली होती. या आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक केली जाते. देशातील मानवी हक्कांचे उल्लंघन, हिंसाचार अशा घटनांची चौकशी करण्याचा अधिकार या आयोगाला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना चकाचक रस्ते? रस्त्यांसाठी महापालिका तब्बल 2 हजार 200 कोटी खर्च करणार
- Shivsena Dasara Melava 2021 : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला रामदास कदम उपस्थित राहणार?
- Coronavirus India Updates : देशात गेल्या 24 तासांत 14 हजार 313 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 181 मृत्यू