नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:च्याच प्रेमात पडलेले आहेत आणि त्यांची एकाधिकारशाही भारतासाठी घातक आहे, अशा शब्दात भाजपचे माजी नेते आणि मंत्री अरूण शौरींनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘वापरा आणि फेकून द्या, हीच मोदींची नीती’, असे म्हणत अरुण शौरींनी पंतप्रधान मोदींना घरचा आहेरही दिला आहे.
येत्या तीन वर्षात नागरी स्वातंत्र्यावर आणखी गदा येण्याची भीतीदेखील भाजपच्या सक्रीय राजकारणातून बाहेर गेलेल्या शौरींनी व्यक्त केली.
मोदी हे प्रत्येक इव्हेंट आपल्या फायद्याकरता वापरून घेतात. त्यासोबतच माणसांबद्दलही 'वापरा आणि फेकून द्या' अशी मोदींची नीती असल्याचाही आसूड शौरींनी यावेळी ओढला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शौरींनी मोदींवर विविध मुद्यांवर निशाणा साधला.
अरुण शौरी हे अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते आणि मोदी सरकारमध्येही त्यांना मंत्रिपद मिळण्याचे अंदाज वर्तवले जात होते. मात्र, ते आता भाजपपासून पूर्णपणे बाजूला सारले गेले आहेत. मोदींच्या कारभारावर स्वपक्षातील माजी वरिष्ठ नेत्यांकडून सातत्याने प्रहार होताना यानिमित्ताने दिसत आहेत.