नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला लोकसभेत उत्तर दिलं. मात्र, यावेळी विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. 15 लाखांच्या घोषणेचं काय झालं? अशी घोषणाबाजी करत विरोधकांनी मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला. तब्बल दीड तास विरोधकांची घोषणाबाजी सुरु होती. दुसरीकडे  मोदींनी देखील काँग्रेसवर जोरदार टीका केली. 'ज्यांनी कायम घराणेशाहीच केली त्यांनी लोकशाहीबद्दल बोलू नये.' अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.


‘क्या हुआ, क्या हुआ, 15 लाख का क्या हुआ’

‘क्या हुआ, क्या हुआ, 15 लाख का क्या हुआ?,  नही चलेगी, नही चलेगी जुमलेबाजी नही चलेगी...’  या घोषणांनी विरोधकांनी अक्षरश: सभागृह दणाणून सोडलं. आंध्रप्रदेशला अर्थसंकल्पात कमी निधी दिल्यामुळे विरोधकांसह टीडीपीच्या खासदारांनी मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तब्बल दीड तास विरोधकांची घोषणाबाजी सुरुच होती. दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी देखील तितक्याच जोशात आपलं भाषण पूर्ण केलं.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे :

वल्लभभाई पटेल हे पहिले पंतप्रधान असते तर...

‘इतिहासात काय घडलं ते मी तुम्हाला सांगतो. जेव्हा काँग्रेस कमेटीची निवडणूक झाली होती त्यावेली 12 पैकी 9 सदस्यांनी सरदार पटेल यांची निवड केली होती. तर 3 जणांनी नोटाला पसंती दिली होती. देशाचे पहिले पंतप्रधान जर सरदार वल्लभभाई पटेल असते तर काश्मीरचा एक हिस्सा पाकिस्तानकडे गेलाच नसता. संपूर्ण काश्मीर हा भारतातच राहिला असता.' असं मोदी यावेळी म्हणाले.

...म्हणून तेव्हा देशाचा विकास झाला नाही

'सुरुवातीच्या काळात पंचायतपासून संसदेपर्यंत तुमच्याचा झेंडा होता. पण इतिहास विसरुन सर्व शक्ती फक्त एकाच कुटुंबाचं गुणगान गाऊ लागला. त्यामुळेच देशाचा विकास झाला नाही.' असं म्हणत मोदींनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर निशाणा साधला.

‘तुम्ही केलेल्या विभाजनाची किंमत आजही देशाला चुकवावी लागते’

'ज्यावेळी अटलबिहारी यांच्या सरकारने तीन राज्यांची निर्मिती केली होती. त्यावेळी ते निर्णय ऐतिहासिक होते. पण जेव्हा तुम्ही देशाचं विभाजन केलं. त्याची किंमत आजही देशाला चुकवावी लागत आहे. तुम्ही (काँग्रेस) देशाचे तुकडे केले?' अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर टीका केली.

‘लोकशाही आमच्या रक्तात आहे’

'नेहरु यांनी लोकशाही देशाला दिली. हे ऐकून मी हैराण झालो. लिच्छवी साम्राज्य आणि बौद्धाच्या वेळी लोकशाही सुरु होती. त्यामुळे काँग्रेस आणि नेहरुंनी देशाला लोकशाही दिलेली नाही. खर्गे हे एका कुटुंबाची भक्ती करुन इथे बसले आहेत. पण तुम्ही जगतगुरु बसवेश्वर यांचं नाव घेण्यास विसरु नका. लोकशाही आमच्या रक्तात आहे, लोकशाही आपली परंपरा आहे.' असा टोलाही मोदींनी हाणला.

‘आम्ही जनतेच्या डोळ्यात धूळ फेकत नाही’

'आम्ही जे काम हातात घेतो ते पूर्ण करण्याचं प्रयत्नही करतो. जनतेच्या डोळ्यात धूळ फेकत नाही. मागील सरकारने केलेल्या चुका आम्ही आता निस्तारत आहोत. सत्ता येते आणि जाते पण देश कायम राहतो.' असंही मोदी यावेळी म्हणाले.

‘काँग्रेस शाहनिशा न करता अनेकांना कर्ज वाटली’

‘काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी कोणतीही शाहनिशा न करता मागेल त्याला कर्ज दिलं. त्याचे मोठे दुष्परिणाम आज पाहायला मिळत आहेत. पण आमच्या सरकारने ही पद्धतच बंद केली. त्यामुळे देशाचं मोठं नुकसान रोखता आलं.’ असं पंतप्रधान म्हणाले.

याचवेळी मोदींनी त्यांच्या सरकारने चार वर्षात केलेलं कामाचा लेखाजोखा लोकसभेत मांडला.