PM Modi on Muslims: नवी दिल्ली : मुस्लिम समाजानं आत्मचिंतन करावं की, काँग्रेसच्या (Congress) काळात आपल्याला लाभ का मिळाला नाही? असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) केलं आहे. जगभरातील मुस्लिम समाज काळानुसार बदलत आहे, त्यामुळे तुम्हीही बदलले पाहिजे. कोणत्याही समाजानं बंधपत्रित कामगारांसारखं जगलेलं मला नकोय, असंही मोदी म्हणाले आहेत. एका मुलाखतीत बोलताना पंतप्रधान मोदींनी (PM Modi) असं वक्तव्य केलं आहे. दरम्यान, मुस्लिमांना असं वाटतंय की, मोदी आले तर सगळंच संपवून टाकतील? असा प्रश्न मोदींना मुलाखतीत विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना मोदींनी हे वक्तव्य केलं आहे. 


ईटी नाऊला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींना विचारण्यात आलं की, 2002 ते 2024 पर्यंत 22 वर्ष उलटून गेली आहेत, तरीही पंतप्रधान मोदी आले तर ते त्यांचा नाश करतील, असं मुस्लिम समाज गृहीत धरत आहेत. यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे? या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "मी जवळपास 25 वर्ष सरकार चालवलंय. गुजरातबाबत तुम्हाला माहिती असेल की, तिथे अठराव्या-एकोणिसाव्या शतकापासून दंगली होत आहेत. यापूर्वी सात दंगली झाल्या होत्या. 10 वर्ष 2002 पासून एकही दंगल झालेली नाही."


मुस्लिम समाजानं आत्मचिंतन करावं : पंतप्रधान मोदी


पंतप्रधान मोदी म्हणाले की, "गुजरातमधील मुस्लिम आजही भाजपला मतदान करतात. आज मी पहिल्यांदाच म्हणत आहे की, मुस्लिम समाजातील शिक्षित लोकांनी आत्मचिंतन करावं. कल्पना करा, देश एवढा प्रगती करत आहे आणि तुमच्या समाजात कमतरता असेल तर काय? याची काय कारणं आहेत? काँग्रेसच्या काळात तुम्हाला सरकारी यंत्रणेचा लाभ का मिळाला नाही?" पुढे बोलताना ते म्हणाले की, "काँग्रेसच्या काळात तुम्ही या दुर्दशेला का बळी पडलात? तुम्ही आत्मपरीक्षण करा."


कोणती मानसिकता मुलांचं भविष्य बिघडवतेय? मोदी म्हणाले... 


मुस्लिम समुदायाला संबोधत पंतप्रधान मोदी म्हणाले, "तुम्हाला सत्तेवर बसवून तुम्हाला हटवू, हा तुमच्या मनातील विचार तुमच्या मुलांचं भविष्य बिघडवत आहे. मुस्लिम समाज जग बदलत आहे." ते म्हणाले, "जेव्हा मी आखाती देशांमध्ये जातो, तेव्हा मला खूप आदर मिळतो. सौदी अरेबियामध्ये योग हा अधिकृत अभ्यासक्रमाचा भाग आहे, पण इथे मी योगाबद्दल बोललो तर त्याला धर्माशी जोडलं जाईल."


मुस्लिम समाजानं मुलांच्या जीवनाचा विचार केला पाहिजे : पंतप्रधान 


पीएम मोदी म्हणाले की, "जेव्हा मी आखाती देशांतील लोकांना भेटतो, तेव्हा ते मला योगाचं प्रशिक्षण कुठे घ्यायचे ते विचारतात. कोणी मला सांगतं की, माझी पत्नी योग शिकण्यासाठी भारतात जाते. इथं योगाभ्यासाला हिंदू-मुस्लिम केलं आहे. ते म्हणाले की, "मी मुस्लिम समाजाला विनंती करतो की, त्यांनी किमान त्यांच्या मुलांच्या जीवनाचा विचार करावा. तुम्हाला कोणीतरी घाबरवत असल्यानं कोणत्याही समाजानं बंधपत्रित कामगारांसारखं जगावं, असं मला वाटत नाही."


पंतप्रधान म्हणाले की, "तुम्ही भाजपला घाबरत असाल, तर एकदा पक्षाच्या कार्यालयात जाऊन बसा. तुम्हाला थोडी तिथून कोणी हकलवणार आहे. तिथे 50 लोक बसलेले असतात. तुम्ही जा आणि तिथे काय चाललं आहे ते पाहा."