PM Modi on Economic Offenders: आर्थिक घोटाळ्यातील फरार आरोपींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इशारा दिला आहे. आर्थिक गुन्हे, घोटाळे करून परदेशात गेलेल्या अनेक हाय-प्रोफाइल आरोपींना मायदेशी आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. या आरोपींनी मायदेशी परतावे, त्यांना अन्य कोणताही पर्याय नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक विकासाच्या मुद्यावर आयोजित एका परिसंवादाला संबोधित केले. त्यावर त्यांनी हे भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात कोणत्याही आरोपीचे नाव घेतले नाही. मात्र, केंद्र सरकारकडून मागील काही महिन्यांपासून विजय मल्ल्या आणि नीरव मोदी सारख्या आरोपींच्या प्रत्यार्पणाचा प्रयत्न जोरदारपणे सुरू आहे.


थकबाकीदारांकडून पाच लाख कोटी रुपये वसूल करण्यात आले असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. नुकतीच स्थापन झालेली नॅशनल अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (NARCL) 2 लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेची विल्हेवाट लावण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले. पुढे त्यांनी म्हटले की, वर्ष 2014 मध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारी बँकांची परिस्थिती सुधारलेली आहे. भारतीय बँका आता देशाच्या अर्थव्यवस्थेत प्राण ओतण्यासाठी मजबूत स्थितीत आहेत. त्यामुळे आत्मनिर्भर भारत होण्याचा मार्ग अधिक सोपा होणार आहे. 


यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकांना धननिर्मिती आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणाऱ्यांना कर्ज देण्यात अधिक सक्रियता दाखवावी असे आवाहन त्यांनी केले. त्याशिवाय, बँकांसोबतच देशातील 'बुक-अकाऊंट' सुधारण्यासाठी बँकांना सक्रियपणे काम करावे लागेल, असे ते म्हणाले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, बँकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी जुन्या पद्धतींचा त्याग करावा लागणार आहे. बँकांनी उद्योग, व्यवसाय जगतासोबतच्या भागिदारीचे मॉडेल स्वीकारण्याचाही सल्ला त्यांनी दिला. 


गेल्या सहा-सात वर्षांत केंद्र सरकारने केलेल्या सुधारणांमुळे बँकिंग क्षेत्राचे बळकटीकरण झाले असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. आम्ही बँकांची NPAसमस्या सोडवली आहे, बँकांमध्ये नवीन भांडवल गुंतवले आहे, कर्ज वसुली न्यायाधिकरणांना अधिकार दिले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. 


पंतप्रधान मोदी यांनी बँकर्सना कंपन्या आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) गरजेनुसार अडचणींवर मात करण्याचे प्रयत्न करण्यास सांगितले. तुम्ही ग्राहक बँकेत येण्याची वाट पाहू नका. तर,  तुम्हाला त्यांच्याकडे जावे लागेल असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.