Anita Bose on Kangna Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. देशाच्या स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर कंगनाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर निशाणा साधला. इंन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत कंगनानं गांधींजींना भुकेले आणि चलाक म्हटलं. एवढंच नव्हे तर भगतसिंगांना फाशी व्हावी, अशी गांधीजींची इच्छा असल्याचंही कंगनानं म्हटलं होतं. कंगनाच्या या वक्तव्यामुळं तिच्यावर टीकेची झोड उठली होती. अशातच आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कन्या अनिता बोस यांनी कंगनावर पलटवार केला आहे. गांधीजींनी नेताजींसह अनेकांना प्रेरणा मिळाली, असं म्हणत अनिता बोस यांनी कंगनावर निशाणा साधलाय. 


मंगळवारी इन्स्टाग्राम स्टोरी टाकत कंगनानं सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंह यांना महात्मा गांधींकडून कोणतंही समर्थन मिळालं नव्हतं, असा दावा केला होता. त्यासोबतच अभिनेत्रीनं गांधीजींच्या अहिंसेच्या मंत्राची खिल्ली उडवत म्हटलं होतं की, कोणासमोर दुसरा गाल पुढं केल्यानं भीक मिळत नाही. 


कंगनाच्या या वक्तव्यावर बोलताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कन्या अनिता बोस यांनी भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या की, "नेताजी आणि गांधीजींचं नातं फारच गुंतागुंतीचं होतं. कारण गांधीजींना वाटायचं की, ते नेताजींवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. तर दुसरीकडे माझे वडिल गांधीजींचे मोठे चाहते होते." पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, "नेताजी आणि गांधीजी दोन्ही व्यक्तिमत्त्व महान होती. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. ते एकमेकांना पूरक असून तो एक बंध होता. भारताच्या स्वातंत्र्यासाठी केवळ अहिंसक धोरणच कारणीभूत आहे, असा दावा काँग्रेसच्या काही सदस्यांकडून दीर्घकाळ करण्यात येत होता. पण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, नेताजी आणि इंडियन नॅशनल आर्मी (आयएनए) च्या कारवायांनी देखील भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठं योगदान दिलं होतं." पुढे बोलताना त्या हेदेखील म्हणाल्या की, "दुसरीकडे असा दावा करणंही चुकीचं ठरेल की, फक्त नेताजी आणि इंडियन नॅशनल आर्मीनं भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. गांधीजींनी नेताजींसह अनेकांना प्रेरणा दिली होती."


काय म्हणाली होती कंगना? 


इंस्टाग्रामवर कंगनाने एका आर्टिकलचा फोटो शेअर केला होता. फोटो शेअर करून तिने लिहीले होते की, 'तुम्ही एकतर गांधीजींचे फॅन होऊ शकता किंवा नेताजींचे समर्थक. तुम्ही दोघांचे समर्थक होऊ शकत नाही. त्यामुळे हा निर्णय स्वत: घ्या.' कंगनाने आणखी एका पोस्टमध्ये लिहीले, 'जे स्वातंत्र्यासाठी लढत होते, त्यांना त्यांनी आपल्या मालकांकडे सोपवले. ते सत्तेचे भुकेले आणि धूर्त होते त्यांच्यामध्ये हिंमत नव्हती. हे तेच लोक होते ज्यांनी आपल्याला शिकवले की, जर कोणी तुमच्या एका गालावर चापट मारली तर दुसरा गाल त्यांच्यासमोर ठेवा, त्यांच्या मते, असं केल्याने तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. अशाने स्वातंत्र्य मिळत नाही, फक्त भीक मिळते,  विचार करून तुमचे हिरो निवडा.' पुढे कंगना म्हणाली, 'गांधीजींनी भगत सिंग, सुभाष चंद्र बोस यांचे कधीच समर्थन केले नाही. काही पुरावे आहेत, ज्यावरून वाटते की गांधीजींची इच्छा होती की, भगत सिंग यांना फाशी मिळावी. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे समर्थन करताना विचार करा. तुम्ही एकाच वेळी दोघांचे समर्थक असू शकत नाही.  त्यांच्या आठवणींना उजाळा देणे आणि दरवर्षी त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना शुभेच्छा देणे पुरेसे नाही. असे करणे अत्यंत बेजबाबदार आहे. त्यामुळे तुमचे आदर्श निवडताना योग्य तो विचार करा.'