PM Modi On Mizoram :  मणिपूरमधील हिंसाचार आणि इतर मुद्यांवरून विरोधकांनी लोकसभेत आणलेल्या अविश्वास दर्शक ठरावाच्या (No Trust Vote) चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी काँग्रेस काळात ईशान्य भारतातील राज्यांवर झालेल्या अन्यायाबाबत, लष्करी कारवाईचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदी यांनी इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या सरकारने 5 मार्च 1966 रोजी हवाई दलाच्या मार्फत हल्ले करून मिझोरममधील (Mizoram) सामान्य नागरिकांचे बळी घेतले असल्याचा दावा केला. ही घटना नेमकी होती काय होती, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला. 


5 मार्च 1966 मध्ये मिझोरमची राजधानी ऐझॉलमध्ये सकाळच्या सुमारास भारतीय हवाई दलाच्या चार लढाऊ विमानांनी घेरून ठिकठीकाणी हल्ला केला. त्यावेळी मिझोरम हा आसाम राज्याचा एक भाग होता. त्याला मिझो हिल्स असे संबोधण्यात येत होते. 


हवाई दलाचा बॉम्ब  हल्ला का?  


1960 मध्ये, आसाम राज्याने आसामी ही भाषा राज्याची अधिकृत राजकीय भाषा म्हणून मान्यता दिली. याचा अर्थ ज्यांना ही भाषा येत नाही, त्यांना सरकारी नोकरीची दारे बंद करण्यात आली. मिझो हिल्समधील नागरिकांनी या निर्णयाचा विरोध केला. असंतोषाला वाचा फोडण्यासाठी 28 फेब्रुवारी 1961 मध्ये  मिझो नॅशनल फ्रंटची स्थापना करण्यात आली.  सुरुवातीच्या काळात या संघटनेने शांततेच्या मार्गाने, लोकशाही मार्गाने आपली भूमिका मांडण्यास सुरुवात केली. 


1964 मध्ये आसामी भाषा लागू झाल्यानंतर आसाम रेजिमेंटने  आपली सेकंड बटालियन बरखास्त केली. यामध्ये बहुतांशी जवान हे मिझो होते. या घटनेनंतर मिझो हिल्समध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला. शांततेने आंदोलन करणाऱ्या MNF ने हिंसाचाराचा मार्ग स्वीकारला. लष्करातून नोकरी गमावलेले जवान MNF मध्ये सहभागी झाले. त्यांनी  मिझो नॅशनल आर्मीची स्थापना केली. 


सीमावर्ती भागात असलेल्या पूर्व पाकिस्तान आणि चीनने या असंतोषाला हवा देण्याचे काम केले. मिझो नॅशनल आर्मीला शस्त्रास्त्रे पुरवण्यात आली असल्याचे म्हटले जाते. सुरक्षा दलांनी मिझो नॅशनल आर्मी विरोधात आक्रमक पवित्रा घेताच या बंडखोरांनी पूर्व पाकिस्तान आणि म्यानमारमध्ये आश्रय घेतला. 


सुरक्षा दला मिझो नॅशनल फ्रंटचा नेता लालडेंगा यांना अटक केली. त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. मात्र, त्यांची निर्दोष सुटका झाली. 1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. ही संधी साधून MNF ने पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या नावे एक निवेदन जारी केले. त्यात, म्हटले की,  मिझो देश हा भारतासोबत स्थायी आणि शांततापूर्ण संबंध ठेवेल की शत्रुत्व स्वीकारेल याचा निर्णय आता भारताच्या हाती आहे. 


11 जानेवारी 1966 मध्ये ताश्कंदमध्ये लाल बहादूर शास्त्री यांचे निधन झाले. त्यानंतरच्या काही दिवसांत MNF ने इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो यांना पत्र लिहिले. इंग्रजांच्या काळातही आम्ही स्वतंत्र होतो. इथे राजकीय जाणीवेतून जन्मलेला राष्ट्रवाद आता परिपक्व झाला आहे. आता आपल्या लोकांची एकच इच्छा आहे की आपला वेगळा देश असावा, असे पत्रात म्हटले होते. 


त्यानंतर 24 जानेवारी रोजी इंदिरा गांधी यांनी देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर चार दिवसांनी 28 जानेवारी रोजी मिझो नॅशनल फ्रंट भारतीय सुरक्षा दलांना हुसकावून लावण्यासाठी ऑपरेशन जेरिकोची सुरुवात केली. त्यानुसार, MNF ने ऐझॉल आणि लुंगलाईमध्ये आसाम रायफल्सच्या छावणीवर हल्ला केला. पुढील दिवशी मिझोरम भारतापासून स्वतंत्र झाला असल्याची घोषणा केली. अचानक झालेल्या या हल्ल्याला तोंड देण्यासाठी भारतीय सुरक्षा दल सज्ज नव्हते, असेही म्हटले जाते. त्यामुळेच मिझो बंडखोरांनी ऐझॉलमधील सरकारी खजिना ताब्यात घेतला. त्याशिवाय, महत्त्वाच्या इमारती, चंफाई आणि लुंगलाई जिल्ह्यातील सैन्याच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर ताबा मिळवला.


बंडखोरांनी शस्त्रास्त्रे लुटली. यामध्ये 6 लाइट मशीन गन, 70 रायफल्स, 16 स्टेन गन, ग्रेनेड फायर करणारी रायफल्स आदींचा समावेश होता. त्याशिवाय अनेक जवानांना ओलीस ठेवण्यात आले होते. हल्ल्यातून दोन जवान कसेबसे वाचले आणि त्यांनी हल्ल्याची माहिती वरिष्ठांनी दिली. बंडखोरांनी टेलिफोन एक्सचेंजलाही लक्ष्य केले. जेणेकरुन  ऐझॉलसोबत भारताचा संबंध तुटला जावा. 


मिझो नॅशनल फ्रंटच्या बंडखोरांनी भारताचा तिरंगा उतरवून आपला ध्वज फडकावला. या हल्ल्याची माहिती मिळताच, पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी प्रत्युत्तरात कारवाईचे आदेश दिले. 


5 मार्च 1966 रोजी हवाई दलाच्या 4 लढाऊ विमानांना ऐझॉलमध्ये MNF बंडखोरांवर बॉम्बफेक करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. यामध्ये फ्रान्समध्ये बनवलेली 2 लढाऊ विमाने, Daise Oregon आणि 2 ब्रिटिश हंटर विमानांचा समावेश होता. आसामधील तेजपूर, कुंबीग्राम आणि जोरहाटमध्ये उड्डाण केल्यानंतर लढाऊ विमानांनी मशीन गनने बंडखोरांवर हल्ला करत बॉम्बही फेकले. या हल्ल्याने घाबरलेल्या स्थानिक नागरिकांनी डोंगराळ भागात आश्रय घेतला. तर, बंडखोरांनी म्यानमार आणि पूर्व पाकिस्तामध्ये आश्रय घेतला. या हल्ल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. इंदिरा गांधी आणि लष्कराने या बॉम्ब हल्ल्याचा इन्कार केला होता. हवाई दलाच्या कारवाईने काही दिवसात बंड मोडीत निघून मिझो हिल्सचा भाग पुन्हा भारत सरकारच्या नियंत्रणात आला.


मिझोरममध्ये 20 वर्ष अशांतता


बंड दडपण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एक पाऊल उचलले. जनरल सॅम माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली नवीन योजना तयार करण्यात आली. 1967 मध्ये, बॉम्बस्फोटाच्या एका वर्षानंतर, सरकारने एक योजना लागू केली ज्या अंतर्गत गावांची पुनर्रचना करण्यात आली. या अंतर्गत, डोंगरात राहणार्‍या हजारो मिझो लोकांना त्यांच्या गावातून काढून मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्थायिक करण्यात आले, जेणेकरून भारतीय प्रशासन त्यांच्यावर लक्ष ठेवू शकेल. मिझोराममधील एकूण 764 गावांपैकी 516 गावांतील रहिवाशांना नव्या ठिकाणी स्थायिक करण्यात आले. मात्र, मिझोरम जवळपास 20 वर्ष अशांतच होते. 


नव्या राज्याची घोषणा


भारत सरकार आणि MNF दरम्यान, शांततेसाठीची बोलणी सुरू होती. राजीव गांधी पंतप्रधान असताना भारत सरकार आणि MNF दरम्यान, ऐतिहासिक शातंता करार झाला. 1987 मध्ये मिझोराम राज्याची स्थापना झाली. याच वर्षी मिझोरममध्ये निवडणूक झाली. या निवडणुकीत लालडेंगा यांच्या पक्षाला बहुमत मिळाले आणि त्यांनी मिझोरमचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.