नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एनडीएच्या बैठकीत एक किस्सा सांगितला आणि जोरदार हशा पिकाला.


नोटाबंदीची मुदत संपल्यानंतर, 31 डिसेंबरला मोदींच्या भाषणापूर्वी देशातील लोकांना धास्ती भरली होती, असं उद्धव ठाकरेंनी सांगताच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही हसू आवरलं नाही.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता काय निर्णय घेतात याकडं सर्वाचं कसं लक्षं लागलं होतं. याचा आधार घेत उद्धव ठाकरेंनी तेव्हाच्या परिस्थितीचा उल्लेख केला.

स्नेहभोजनाचा आस्वाद

या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला.

या बैठकीला महाराष्ट्रातून रासपचे महादेव जानकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत, अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर हे देखील उपस्थित होते.

2019 ची लोकसभा निवडणूक मोदींच्या नेतृत्त्वातच !

दिल्लीत मोदींच्या अध्यक्षतेखाली एनडीएच्या घटकपक्षांची बैठक पार पडली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातच 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली जाईल, याबाबत एनडीएतील घटकपक्षांचं एकमत झालं. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह 32 घटकपक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

2019 ची लोकसभा निवडणूक लढण्याविषयी या बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतरची एनडीएची ही दुसरी बैठक आहे.