नवी दिल्ली : सार्वजनिक कार्यासाठी दिल्या जाणाऱ्या 'पद्म' पुरस्कारांसाठी  सरकारनं तुमच्याकडून नामांकनं मागवली आहेत. 'People's Padma 2020' या नावानं ही नामांकन प्रक्रिया केंद्र सरकारनं सुरू केली आहे. सार्वजनिक क्षेत्रात भरीव आणि ठसा उमटवणारं काम करणाऱ्या मान्यवरांना 'पद्म' पुरस्कारांनी गौरविलं जातं. 'भारतरत्न' या सर्वोच्च नागरी पुरस्कारानंतर 'पद्म' पुरस्कार महत्वाचे मानले जातात. 'पद्मश्री', 'पद्मभूषण' आणि 'पद्मविभूषण' असे हे 'पद्म' पुरस्कार आहेत.



गेल्यावर्षीपासून केंद्र सरकारनं 'पद्म' पुरस्कारांसाठी लोकांकडून नामांकनं मागवणं सुरू केलंय. आतापर्यंत केवळ निवड समितीकडूनच 'पद्म' पुरस्कारांसाठी नावं निश्चित केली जात. अनेकदा 'पद्म' पुरस्कारार्थींची नावं जाहीर झाल्यावर प्रचंड वादंगही उठला. त्यामुळेच 'पद्म' पुरस्कार देण्याची प्रक्रिया लोकांपर्यंत नेण्यासाठी 'लोकांचे पद्म' पुरस्कार' हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचं केंद्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर नमूद करण्यात आलंय.


नामांकनं पाठवण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर आहे. PadmaAwards.gov.in या संकेत स्थळावर नामांकनं भरता येतील. 'पद्म' पुरस्कारांसाठी निवड झालेल्या मान्यवरांची नावं येत्या प्रजासत्ताक दिनी जाहीर केली जातील.

आतापर्यंत ‘पद्म’ पुरस्कारांसाठी निवड विविध मंत्रालयांच्या शिफारशींच्या आधारे केली जात होती. केंद्र सरकारने यात थोडी सुधारणा करून केवळ सरकारी शिफारशीचे बंधन काढून टाकले आहे. यापुढे देशातील कोणीही नागरिक ‘पद्म’ पुरस्कारासाठी नावांची आॅनलाइन शिफारस करू शकेल. या बदलामुळे प्रसिद्धीच्या झोतात न राहता काम करणाऱ्या लोकांच्या कामाचे योग्य मूल्यमापन होणार आहे.