PM Narendra Modi Speech : वैद्यकीय शिक्षणासाठी (Medical Education) भारतातील मुलांना विदेशात शिक्षणासाठी जावे लागते. यासाठी त्यांचा मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होत आहे. त्यामुळे आता येत्या पाच वर्षात 75 हजार जागा वाढवण्यात येतील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केली आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence Day 2024) लाल किल्ल्यावरुन भाषण करताना ते बोलत होते. 


भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते तिरंगा फडकावला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषण केले. यात त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे.


मेडिकल क्षेत्रात 75 हजार नव्या जागा निर्माण करणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, वैद्यकीय शिक्षणासाठी आमची मुले देशाबाहेर जात आहेत. यामध्ये जास्त करुन मध्यवर्गीय कुटुंबातील मुले आहेत, यासाठी मुलांचे करोडो रुपये खर्च होतात. सुमारे 25 हजार तरुण दरवर्षी मेडिकलच्या शिक्षणासाठी परदेशात जातात. कधी कधी अशा देशात जावे लागते की मी विचार केला तर हैराण व्हायला होते. त्यामुळे गेल्या 10 वर्षात आम्ही मेडिकलच्या जागा वाढवून त्या 1 लाख केल्या आहे. येत्या पाच वर्षात मेडिकल क्षेत्रात 75 हजार नव्या जागा तयार केल्या जातील, अशी घोषणा त्यांनी केली आहे.





 


नव्या धोरणामुळे प्रत्येक क्षेत्राला ताकद


पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, आज माझ्या देशातील तरुणाला हळूहळू चालायचे नाही. देशातील तरुणाला थेट भरारी घ्यायची आहे. भारताचा हा सुवर्णकाळ असून आपल्याला संधी गमवायची नाही. आपण याच संधीचा फायदा घेऊन स्वप्न आणि संकल्पना घेऊन पुढे गेलो तर 2047 पर्यंत भारताला विकसित करण्याचे स्वप्न पूर्ण होईल. एमएसएमई, शिक्षण, आरोग्य, वाहतूक, कृषी अशा प्रत्येक क्षेत्रात नवी आणि आधुनिक यंत्रणा उभी राहत आहे. आपण आपल्या देशातील परिस्थितीनुसार पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येक क्षेत्रात आधुनिकतेची गरज आहे. तंत्रज्ञानाची गरज आहे. आमच्या नव्या धोरणामुळे प्रत्येक क्षेत्राला ताकद मिळत आहे.   


आणखी वाचा 


PM Modi Speech: पूर्वी देशात सरकार मायबाप होतं, नागरिकांना हात पसरावे लागायचे, आम्ही प्रशासनाचं मॉडेल बदललं: मोदी