नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नॅशनल मेट्रोलॉजी कॉन्क्लेवमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. पंतप्रधानांनी यावेळी कोच्ची-मंगळुरु गॅस पाइपलाइन देशाला समर्पित केली. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "नवं वर्ष देशासाठी नव्या आकांशा घेऊन आलं आहे. नव्या वर्षात देशाला दोन मेड इन इंडिया कोरोना वॅक्सिन मिळाल्या आहेत. देशाला संशोधकांवर गर्व आहे आणि त्यांचं हे योगदान नेहमीच लक्षात राहिलं."


पंतप्रधान मोदी म्हणाले की, यावेळी भारतासमोर नवं ध्येय, नवी आव्हानं आहेत, आणि भारत या सर्वांचा सामना करत आहे. नव्या दशकात गुणवत्ता आणि मापाच्या दिशेत नवी दिशा देणं गरजेचं आहे. जगभरात सध्याच्या घडीला भारताची उत्पादनं कुठे-कुठे आहेत, यासाठी मेट्रोलॉजीचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे.





ब्रँड इंडियाला क्वॉलिटी, क्वांटीटी दोनही बाजूंनी विश्वासार्ह बनवायचंय : पंतप्रधान नरेंद्र मोदी


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपल्याला जगभरात केवळ भारतीय उत्पादनं पोहोचवायची नाहीत, तर भारतीय उत्पादनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या मनात उत्पादनांप्रती विश्वास निर्माण करायचा आहे. आपल्याला ब्रँड इंडियाला क्वॉलिटी, क्वॉटिटी दोन्ही बाबतीत विश्वासार्ह्य बनवायचं आहे. तसेच भारतीय उत्पादन खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचं मन आपल्याला जिंकायचं आहे. आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे.


पंतप्रधान मोदी म्हणाले की, "मेड इन इंडियाची ग्लोबल डिमांड सर्वांपर्यंत पोहोचावी या दिशेने प्रयत्न करण्यात येणार आहेत. आत्मनिर्भर भारतात क्वॉलिटी आणि क्वाँटिटि दोन्हींवर भर देणं गरजेचं आहे. तसेच आपण क्वॉलिटीसाठी विदेशी स्टँडर्सवर अवलंबून राहता कामा नये."


लोकल फॉर ग्लोबलवर भर


पंतप्रधान मोदी म्हणाले की, "नव्या वर्षात भारत आणि भारतीय उत्पादकांची ताकद वाढवणं गरजेचं आहे. त्यासाठी लोकल उत्पादनांना ग्लोबल ओळख मिळवून देण्यासाठी अभियान सुरु करण्याची गरज आहे. आपल्याला उत्पादनांमध्ये सुधारणा करण्यासाठी तंत्रज्ञानाता वापर करणं गरजेचं आहे. त्यामुळे एक्सपोर्ट आणि इंपोर्ट क्वॉलिटी सुनिश्चित करण्यास मदत होईल. या वर्षात भारताला नव्या उंचीवर नेणं गरजेचं आहे."